भाड्याला नकार देण्याबरोबरच मनमानी कारभार करणाऱ्या काळी पिवळी, मोबाईल ॲप आधारित मुजोर टॅक्सी चालकांविरोधात तक्रार करणे प्रवाशांना आता सोप्पे होणार आहे. दक्षिण मुंबईत चालकांविरोधात तक्रार करण्यासाठी ताडदेव आरटीओने ९०७६२०१०१० हा मदत क्रमांक उपलब्ध केला आहे. या क्रमांकावर केलेल्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन दोषी चालकावर वाहन परवाना किंवा अनुज्ञप्ती (लायसन्स) निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी गुरुवार, १ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून आणखी पाच विभागप्रमखांची नियुक्ती
प्रवाशांच्या मदतीसाठी ताडदेव आरटीओने तीन अधिकाऱ्याचे विशेष पथक तैनात केले आहे. त्या पथकाला एका वाहनासोबतच संपर्क साधण्यासाठी मोबाइल, लॅपटॉप, दूरध्वनी, इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्या आली आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ९०७६२०१०१० हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करण्यात आला असून प्रवाशांना त्यावर टॅक्सीचालकांविरोधात तक्रार करता येईल. प्रवाशांना रात्री प्रवासादरम्यान समस्या भेडसावल्यास mh01taxicomplaint@gmail.com या ई-मेलवरही पुराव्यानिशी तक्रार दाखल करता येईल.
PHOTOS : … अन् मुंबईत प्रथमच भुयारी मार्गावरून मेट्रो धावली
प्रवाशांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधी मोबाइलवर संपर्क साधून किंवा व्हॉटसअपवर संदेश पाठवून, तसेच केवळ लघुसंदेश पाठवून तक्रार करता येईल. पुराव्यानिशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर टॅक्सीचालकाला नोटीस पाठवून खुलासा मागवण्यात येणार आहे. तक्रार निवारणसाठी वेगळा कक्ष स्थापन करण्यात आला असून दोषी चालकावर परवाना किंवा अनुज्ञप्ती निलंबनाची किंवा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
जीवनदूत टॅक्सी योजना –
एखादा अपघात झाल्यानंतर सेवाभावी वृत्तीने अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी टॅक्सीचालकांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ताडदेव आरटीओने जीवनदूत सत्कार योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार टॅक्सीचालकांचा गौरव करण्यात येणार आहे.