बसमधील गर्दीत तिकीट काढताना उडणारा गोंधळ टाळण्यासाठी, तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तीन वर्षांपूर्वी मुंबईत विनावाहक बस सेवा सुरू केली. मात्र या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असून वाहकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही थांब्यावर वाहक उपलब्ध नसल्याने चालकांना बस थांबविणे शक्य होत नाही. तसेच बसमध्ये वाहक नसल्यास प्रवाशांना पुढील थांब्यावरील वाहकाकडून तिकीट मिळवण्यासाठी बरीच धडपड करावी लागते. मुंबईतील काही थांब्यावर असे प्रकार सर्रास होत आहेत.
बेस्ट उपक्रमाने २०१९ मध्ये काही मार्गांवर विनावाहक बस सेवा सुरू केली. या बसमधून प्रवास करण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांना थांब्यावर वाहकाकडून तिकीट देण्यात येते आणि त्यानंतरच बसमध्ये प्रवेश मिळतो. त्यामुळे ही सेवा सुरू होताच सुरुवातीला गोंधळ उडाला होता. तिकीट घेण्यासाठी थांब्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एरवी थांब्यावर आलेल्या बसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत होती. विनावाहक सेवा सुरू झाल्यानंतर बस ताफा कमी आणि प्रवासी जास्त अशी अवस्था झाली. त्यामुळे बराच वेळ रांगेत उभे राहिल्यानंतरही बसमध्ये प्रवेश मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या.
यावेळी विनावाहक बस गाडयांनाही बरीच गर्दी –
सध्या या उलट परिस्थिती असून बस ताफा वाढला आहे. मात्र विनावाहक बसचे तिकीट काढताना प्रवासी आणि वाहकाला बरीच कसरत करावी लागत आहे. यामध्ये दोघांचाही वेळ वाया जात असून बेस्ट बसचा प्रवासही लांबत आहे. मुंबईतील विशेष करून दक्षिण मुंबईत सकाळी कामानिमित्त येणाऱ्याची संख्या अधिक आहे. सायंकाळी पुन्हा परतीचा प्रवास करताना प्रवाशांना गर्दीला तोंड द्यावे लागते. यावेळी विनावाहक बस गाडयांनाही बरीच गर्दी होते.
प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर –
काही थांब्यावर उपलब्ध वाहकांकडून रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना तिकीट मिळते. मात्र काही थांब्यावर वाहकच नसतो. त्यामुळे थांब्यावर आलेल्या विनावाहक बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशाना पुढील थांब्यावरील वाहकाकडून तिकीट घ्यावे लागते. यासाठी प्रवाशांना बेस्टच्या पुढील दरवाजात जाऊन तिकीट घेण्याची कसरत करावी लागते. काही वेळा प्रवाशाला आपले आसनही सोडावे लागते. दुसरा प्रवासी त्या आसनावर बसल्यामुळे उभयतांमध्ये वाद होतात. काही वेळा थांब्यावर वाहक उपलब्ध नसल्यास चालक बस रिकामी असली तरीही तेथे थांबवत नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
तिकीट देण्यास विलंब झाल्यास वाहकाने पुढील थांब्यावर उतरावे –
“असे प्रकार सर्रास घडत असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येत आहे. बसमधील प्रवाशांना तिकीट देण्यासाठी थांब्यावरील वाहकाने बसमध्ये प्रवेश करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. तिकीट देण्यास विलंब झाल्यास वाहकाने पुढील थांब्यावर उतरावे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही. त्याचबरोबर विनाप्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही रोखता येईल.” असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
त्यामुळे पुढील थांब्यावरील वाहकांकडून तिकीट घ्यावे लागते –
“बेस्टच्या बस क्रमांक ११५ मधून प्रवास करताना अनेक वेळा असा अनुभव येतो. काही वेळा थांब्यावर वाहक नसतो. त्यामुळे पुढील थांब्यावरील वाहकांकडून तिकीट घ्यावे लागते. त्यासाठी आसन सोडून दरवाजापर्यंत जावे लागते.” असे बस प्रवासी राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.