मुंबई : दररोजच्या धावपळीच्या जीवनात सुदृढ व निरोगी राहण्यासाठी आज ‘हर दिल मुंबई’चा नारा देत मुंबईकरांची पहाट झाली. जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५’ ही स्पर्धा रविवार, १९ जानेवारी रोजी पार पडत असून युवा पिढीचा सळसळता उत्साह, ज्येष्ठ नागरिकांची जिद्द आणि दिव्यांगांची प्रेरणादायी धाव मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे.

हजारो मुंबईकर नागरिकांसह जगभरातील धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान, मुख्य मॅरेथॉन ४२.१९५ कि.मी., अर्ध मॅरेथॉन २१.०९७ कि.मी., ओपन मॅरेथॉन १० कि.मी., चॅम्पियन्स विथ डिसएबिलिटी १.३ कि.मी., ज्येष्ठ नागरिक रन ४.२ कि.मी. आणि ड्रीम रन ५.९ कि.मी. या गटात मुंबई मॅरेथॉन स्पर्धा पार पडत आहे. दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक परिसरातून पहाटे ५ वाजता मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. तर अर्ध मॅरेथॉन या प्रकारातील स्पर्धा माहिम कॉजवे येथील माहिम रेती बंदर ग्राउंड येथून सुरू झाली. अनेकांनी व्यायाम (वॉर्म अप) करून धावायला सुरूवात केली.

हेही वाचा – Saif Ali Khan Latest News : सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबईत नेमका कुठे वास्तव्याला?

‘मुंबई मॅरेथॉन’ या स्पर्धेने यंदा द्विदशकपूर्ती केली आहे. एरवी घडयाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांच्या उत्साहालाही उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सुरक्षा दलाच्या जवानांची मोठी फौजही तैनात आहे. विविध गटांचा मॅरेथॉन स्थळाकडे जाणारा मार्ग दाखविण्यासाठी ‘सीएसएमटी’ रेल्वे स्थानकावर स्वयंसेवक उभे आहेत. एका रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धकांना मॅरेथॉनस्थळी सोडण्यात येत आहे. तसेच मॅरेथॉन मार्गावर विविध दिशादर्शक तसेच माहितीपर फलक आणि एलइडी स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत. मॅरेथॉन मार्गावर अनेकांना छायाचित्रे व सेल्फी टिपण्याचा आणि चित्रफिती काढण्याचा मोह आवरत नाही आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मॅरेथॉनबाबत उत्सुकता आणि उत्साह पाहायला मिळत असून ‘हर दिल मुंबई’चा नारा देत धावपटू मुंबईच्या रस्त्यांवर धावत आहेत.

लोकल रेल्वेला पसंती

मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते वाहतुकीत बदल करण्यासह जादा लोकल रेल्वेच्या फेऱ्याही सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीतील बदल लक्षात घेऊन बहुसंख्य मुंबईकरांनी लोकल रेल्वेनेच प्रवास करत मॅरेथॉनस्थळी पोहोचणे पसंत केले आहे. त्यामुळे एरव्ही कामाच्या निमित्ताने तुडुंब भरणारी लोकल रेल्वे ऐन रविवारी मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने भरली. पहाटे चार वाजल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात (सीएसएमटी) धावपटूंनी गर्दी केली.

गीतकार गुलजार यांचे प्रोत्साहन

टाटा मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने युवा पिढीचा सळसळता उत्साह आणि ज्येष्ठ नागरिकांची जिद्द मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. तर ‘चॅम्पियन्स विथ डिसएबिलिटी’ या गटाअंतर्गत सहभागी झालेल्या दिव्यांगांची धाव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. यावेळी दिव्यांग व विशेष मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी ज्येष्ठ लेखक व गीतकार गुलजार हे सहभागी झाले होते.

हेही वाचा – Saif Ali Khan : सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर

दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक येथून सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी ‘चॅम्पियन्स विथ डिसएबिलिटी’ या गटातील मॅरेथॉनला सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवर उपस्थित होते. हिंदी चित्रपटसृष्टी आणि शब्दमैफीलींच्या दुनियेमध्ये आपला विशेष ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ लेखक व गीतकार गुलजार यांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली. वयाच्या ९० व्या वर्षीही गुलजार यांचा उत्साह दिव्यांग तसेच विशेष मुलांना प्रोत्साहित करणारा ठरला.

‘मुंबई मॅरेथॉन’ या स्पर्धेने यंदा द्विदशकपूर्ती केली आहे. या अनुषंगाने घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांच्या उत्साहालाही उधाण आले आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मॅरेथॉनबाबत उत्सुकता आणि उत्साह पाहायला मिळत असून ‘हर दिल मुंबई’चा नारा देत धावपटू मुंबईच्या रस्त्यांवर धावत आहेत.


Story img Loader