मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात सुरू असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) रस्ता रोधक हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले करीत आहे. आतापर्यंत ३३.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील १४,७१६ चौरस मीटर लांबीचे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे.
‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या कामाला २०१६ पासून सुरुवात झाली. ही मार्गिका भुयारी असली तरी या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता रोधक उभारून रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. रस्ते बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र मागील एक-दीड वर्षांपासून एमएमआरसीने हळूहळू रस्ता रोधक हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत १४,७१६ मीटर लांबीचे रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. या मार्गिकेचे सात टप्प्यात (पॅकेज) काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील १८८७.५ मीटर लांबीचे, दुसऱ्या टप्प्यात १८० मीटर लांबीचे, तिसऱ्या टप्प्यात १५१५.९ मीटर लांबीचे, चौथ्या टप्प्यात ३५३६ मीटर लांबीचे, पाचव्या टप्प्यात ४९१८ मीटर लांबीचे आणि सातव्या टप्प्यात २६८० मीटर लांबीचे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. यापुढे ‘मेट्रो ३’ मार्गिकेचे काम जसजसे पूर्ण होईल, तसतसे उर्वरित रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत.
हेही वाचा – मुंबई : रे रोडमधील देवीदयाल कंपाऊंडमध्ये भीषण आग, जीवितहानी नाही
‘मेट्रो ३’ मार्गिकेतील पहिल्या टप्प्यामधील आरे – बीकेसी दरम्यानचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील बीकेसी-वरळी आणि तिसऱ्या टप्प्यातील वरळी – कुलाबा दरम्यानची मार्गिका काही महिन्यांनी वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत ही संपूर्ण मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत ‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या कमासाठी बंद करण्यात आलेले सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले होतील आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल.