मुंबई : भारतीय बनावटीची लढाऊ विमाने व हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कवायती पाहण्याची मुंबईकरांना संधी मिळावी यासाठी भारतीय हवाई दलाने मुंबईमध्ये १३ व १४ जानेवारी रोजी हवाई कसरतींचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने नागरिकांना शनिवारी भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडले. वायुसेनेच्या लढाऊ विमानांचा थरार अनुभवण्यासाठी पहिल्याच दिवशी नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी परिसरात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. हवाई दलाच्या जवानांनी केलेल्या चित्तवेधक कसरती व प्रात्यक्षिक पाहण्यात नागरिक दंग झाले होते, तर लढावू विमानांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मुंबईकरांनी या अविस्मरणीय क्षणांचा आनंद लुटला.
भारतीय हवाई दल हे जगभरातील सर्वाधिक शक्तिशाली हवाई दलांपैकी एक आहे. मुंबईमध्ये तब्बल २० वर्षांनी आयोजित करण्यात आलेल्या हवाई प्रात्यक्षिकांमध्ये हवाई दलातील सूर्यकिरण, सारंग व आकाशगंगा या पथकांनी वैविध्यपूर्ण सादरीकरणांतून मुंबईकरांना अचंबित केले. आकाशगंगा पथकाने कार्यक्रमाच्या सुरुवातीला आकाशात उत्तुंग भरारी घेऊन भारताचा तिरंगा व हवाई दलाचा झेंडा फडकावून उपस्थितांमध्ये अनामिक ऊर्जा निर्माण केली. त्यानंतर सूर्यकिरण व सारंग या पथकांनी निरनिराळ्या, काळजाचा ठाव घेणाऱ्या कवायती सादर केल्या. दरम्यान, सू – ३० या लढाऊ विमानानेही आपल्या शौर्याचे व शक्तीचे प्रदर्शन केले. तसेच, सी – १३० या मालवाहू विमानेचेही यावेळी दर्शन घडले. हवाई दलाचा हा रोमांच अनुभवताना उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा ऊर अभिमानाने दाटून आला होता. जमिनीपासून दहा हजार फूट उंचीवर हवेत सूर मारणारी विमाने पाहण्यासाठी नरिमन पॉईंट परिसरात पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. देशभक्तीपर गीतांनी अवघा परिसर दुमदुमला होता.
हेही वाचा – मुंबई : शस्त्रांसह दोन सराईत आरोपींना अटक
या अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी मुंबई उपनगर तसेच ठाणे जिल्ह्यातूनही अनेक पर्यटक नरिमन पॉइंट परिसरात दाखल झाले होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक वाहनांना संबंधित परिसरात बंदी घालण्यात आली होती. परिणामी, पर्यटकांना चालत कार्यक्रमस्थळ गाठावे लागले. तसेच, संबंधित परिसरात वाहनांवर बंदी घालण्यात आल्याने दक्षिण मुंबईतील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. भारतीय हवाई दलाचा डोळ्यांचे पारणे फेडणारा हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी रविवारीही (आज) सकाळी १०. ३० ते दुपारी २ या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.