मुंबई पालिकेच्या क्षयरोग रुग्णालयात ‘एक्सडीआर टीबी’ झालेले २६ रुग्ण नोंदले गेले आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयात अनेक जण उपचार घेत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या रोगावरील सर्व औषधे पालिकेकडे उपलब्ध आहेत. पालिकेकडून हे उपचार मोफत केले जातात. परंतु, पूरक सकस आहार व उपचारातील नियमितपणा या गोष्टी पाळल्या गेल्या तरच रुग्ण बरा होतो.  
 सर्वसामान्य क्षयरोग झालेल्या रुग्णाला सहा महिने उपचार केले जातात. दुसऱ्या टप्प्यात स्टेप्टोमायसिनची २४ इंजेक्शने आणि नऊ महिन्यांचा गोळ्यांचा कोर्स पूर्ण करावा लागतो. परंतु नियमितपणे उपचार न घेणाऱ्या रुग्णाला ‘एमडीआर टीबी’ला सामोरे जावे लागते. अशा रुग्णाला दोन वर्षे नियमितपणे औषधे घ्यावी लागतात. टॅनामायसिन इंजेक्शन आणि आठ ते १४ गोळ्या रुग्णाला खाव्या लागतात. या औषधांमुळे रुग्णांना उलटय़ा, सांधेदुखीचा त्रास होतो. दृष्टी आणि श्रवणक्षमता मंदावते. त्यामुळे रुग्ण चिडचिडे बनतात. वेळप्रसंगी ते मनोरुग्णही बनतात.
मात्र नियमितपणे औषधोपचार आणि पोषक आहार घेतल्यास हा रुग्ण बरा होऊ शकतो. परंतु अनेक रुग्ण मध्येच औषध घेणे बंद करतात. त्यामुळे ‘एमडीआर टीबी’ग्रस्त रुग्णाची प्रकृती अधिकच खालावत जाते आणि औषधांचाही उपयोग होईनासा होतो. अखेर त्याला ‘एक्सडीआर टीबी’ होतो. अशा रुग्णाला टॅपरामायसिन इंजेक्शन आणि औषधांच्या असंख्य गोळ्या घ्याव्या लागतात. औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे औषधे न घेण्याकडे त्यांचा कल वाढतो आणि त्यामुळेच वेळप्रसंगी रुग्ण दगावतो. मात्र व्यवस्थित उपचार व पथ्यपाणी केल्यास रुग्ण बरा होऊ शकतो.