महिन्याभरातील १५वी दरवाढ
मुंबईत पेट्रोलच्या दराने शनिवारी शंभरी पार केली. मुंबईत पेट्रोल १०० रुपये १९ पैसे, तर डिझेल ९२ रुपये १७ पैसे झाले आहे. पेट्रोलच्या दरात लिटरमागे २६ पैसे, तर डिझेल दरात २८ पैसै वाढ करण्यात आल्याचे सरकारी इंधन कंपन्यांनी जाहीर केले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात परभणीतील पेट्रोलचे दर आधीच शंभरीपार गेले होते. आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलदर शंभरीपार गेले आहेत. पेट्रोलचे दर मुंबईत १०० रुपये १९ पैसे झाले असून डिझेलचे दर ९२ रुपये १७ पैसे झाले आहेत.
राज्यांमध्ये स्थानिक मूल्यवर्धित कर वेगळा असल्याने इंधनाचे दर वेगवेगळे असतात. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर ९३ रुपये ९४ पैसे झाले असून डिझेलचे दर ८४ रुपये ८९ पैसे झाले आहेत. गेल्या ४ मेपासूनची ही १५वी इंधन दरवाढ आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या वेळी दरवाढ १८ दिवस रोखण्यात आली होती. राजस्थानात श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल १०४.९४ पैसे लिटर असून डिझेल ९७ रुपये ७९ पैसे आहे.
वाढ किती? गेल्या महिन्याभरात १५ वेळा इंधनाची दरवाढ करण्यात आली आणि त्यात पेट्रोलचे दर तीन रुपये ५४ पैसे, तर डिझेलचे दर चार रुपये १६ पैशांनी वाढवण्यात आले आहेत.