मुंबई : दिल्लीतील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय वैमानिक तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी पवई पोलिसांनी २७ वर्षीय मित्राला अटक केली. अंधेरीमधील मरोळ येथील राहत्या घरात सृष्टी विशाल तुली (२५) या तरूणीने आत्महत्या केली होती. याप्रकरणी तपासात मृत तरूणीने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ कॉल करून आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले होते.
अंधेरी (पूर्व) येथील मरोळ पोलीस कॅम्पमागील कानाकिया रेन फॉरेस्ट येथील भाड्याच्या घरात राहणाऱ्या या तरूणीने सोमवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा मित्र आदित्य पंडितनेही वैमानिक बनण्यासाठी परीक्षा दिली होती. पण तो अपयशी ठरला होता. तो मूळचा फरीदाबाद येथून रहिवासी आहे. प्राथमिक तपासानुसार, तुली रविवारी गोरखपूरहून परतल्यावर तिचे पंडितसोबत भांडण झाले. पंडित मध्यरात्री १ वाजता दिल्लीला जाण्यासाठी घरातून निघाला. तुलीने त्याला व्हिडिओ कॉल करून आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. आरोपी पंडितने तुलीसोबतचे संदेश व चॅट डिलीट केले. पोलिसांनी पंडितचा मोबाइल जप्त केला असून याप्रकरणी न्यायवैधक प्रयोगशाळेची मदत घेण्यात येत आहे.
हेही वाचा : आता हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होणार
तुलीने पंडितला २५ नोव्हेंबर रोजी १० ते ११ दूरध्वनी केले होते. त्यातील बहुसंख्य दूरध्वनी आरोपी पंडितने उचलले नाहीत. तुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार, पंडित तिच्यासोबत सर्वांसमोर भांडण करायचा. मासांहार करण्यावरूनही त्यांच्यात वाद झाले होते. आत्महत्येप्रकरणी पवई पोलिसांनी पंडितला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी तुलीचे काका विवेककुमार यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट जाहीर
मृत तरूणीला जून २०२३ मध्ये व्यावसायिक वैमानिक पदावर नियुक्ती मिळाली. त्यामुळे ती कामावर रुजू होण्यासाठी मुंबईत स्थायिक झाली. पण आरोपी वैमानिकाची परीक्षा पास होऊ शकला नाही. प्राथमिक तपासानुसार गेल्या सहा महिन्यांपासून तुली राहत असलेल्या सदनिकेत आरोपी पंडित नियमित येत होता.