मुंबई : लाकडावरील भट्टया स्वच्छ इंधनावर रुपांतरित करण्यासाठी बेकरी उद्योगाला पालिका प्रशसानाने नोटीसा धाडल्या आहेत व कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र महालक्ष्मी येथील सुप्रसिद्ध धोबीघाटाला पालिकेच्या खर्चाने पीएनजी (पाईप नॅचरल गॅस)ची जोडणी देण्यात येणार आहे. धोबीघाटात पाणी गरम गरम करण्यासाठी लाकूड जाळून जाळ केला जातो त्यामुळे होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे. पालिका या कामासाठी २४ कोटी रुपये खर्च करणार आहे.

महालक्ष्मी स्थानकाजवळील धोबीघाटावर गेल्या अनेक वर्षांपासून धोबी समाज आपला उदरनिर्वाह करतात. अनेक वर्षांपासून या ठिकाणी कपडे धुणे, कपड्यांना रंग चढवणे, कपडे वाळवणे, ईस्त्री करणे अशा अनेक प्रक्रिया करत असतात. यामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणावर पाणी गरम करण्यासाठी लाकूड जाळून जाळ तयार केला जातो. कधी चिंध्या, टाकाऊ कापड, टाकाऊ प्लास्टिक याचा वापर करून जाळ तेवत ठेवलेला असतो. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. धोबीघाटात काम करणाऱ्या अनेकांना दमा, क्षयरोग असे आजार जडतात. तर काही धोबी हे एलपीजी सिलिंडरचा वापर करतात. मोठ्या प्रमाणावर सिलिंडर असल्यामुळे या परिसराला आग लागण्याचा धोकाही मोठा आहे. तसेच जागेच्या मर्यादेमुळे अनेकदा सिलिंडरचा साठा करण्यावरही मर्यादा येतात. त्यामुळे धोबीघाटाला पीएनजीची यंत्रणा बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास सहकारी संस्था मर्यादित ही संस्था धोबीघाटातील कामगारांना दैनंदिन कामादरम्यान उदभवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम करते. या संस्थेने धोबीघाटात पीएनजी गॅस जोडणीची मागणी केली आहे. पीएनजी पर्यावरणपूरक असल्यामुळे एलपीजीपेक्षा सुरक्षित व स्वस्त आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धोबीघाटावर पीएनजी वितरण व जोडणी तसेच उपकरणे यांचा पुरवठा करण्यासाठी पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाने निविदा मागवून कंत्राटदार निश्चित केला आहे. या कामासाठी २० कोटी ९८ लाखांचे कंत्राट देण्यात आले आहे. सर्व करांसह हा खर्च २४ कोटींवर गेला आहे.

दरम्यान, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी याबाबत म्हटले आहे की धोबीघाटाप्रमाणेच बेकरी उद्योगालाही पालिकेने आर्थिक सहाय्य केले पाहिजे. मुंबईत दोन हजार पेक्षा अधिक बेकरी असून त्यावर सुमारे दोन लाख लोकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार आहे. बेकरी उद्योगाला पालिकेने जळाऊ लाकूड वापरून भट्टी वापरण्यास बंदी केली आहे. पण त्यांच्या समस्या ऐकण्यास पालिकेने सुनावणी तरी घ्यावी अशी आमची मागणी आहे.

महालक्ष्मी स्थानकाच्या जवळच असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. या धोबीघाटाचा विस्तार सुमारे ८१.४० चौरस मीटर असून २०११ मध्ये गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठा धोबीघाट म्हणून नोंदही झालेली आहे.

Story img Loader