मुंबईः गेल्या १९ वर्षांपासून पोलिसांचा ससेमिरा चुकवणाऱ्या फरार आरोपीला अटक करण्यात अँटॉपहिल पोलिसांना यश आले आहे. आरोपी ओळख लपवून बोटीवर काम करत होता. तो अधूनमधून नातेवाईकांना भेटण्यासाठी मुंबईत येत होता. प्रकाश अनंत सुर्वे (५७) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो शीव कोळीवाडा येथील प्रतिक्षा नगर चाळीत राहत होता. त्याच्याविरोधात गंभीर दुखापत व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.
सुर्वे याच्या विरोधात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, ६१ वे न्यायालय, कुर्ला यांंनी अटक वॉरंट जारी केले होते. ते वॉरंट स्थानिक अँटॉप हिल पोलीस ठाण्याला प्राप्त झाले होते. ते वॉरंट बजावणी करण्यासाठी तसेच फरारी आरोपीचा शोध घेण्याकरता एक विशेष पथक तयार करण्यात आले. या विशेष तडीपार पथकाने आरोपीचा शोध घेण्याकरता जुन्या कागदपत्रांची पाहणी केली. त्यात त्याचे मित्र व नातेवाईकांची माहिती मिळाली. तसेच तो राहात असलेल्या प्रतिक्षा नगर परिसरात तपासणी केली असता तो गेल्या अनेक वर्षांपासून तेथे आला नसल्याचे समजले. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अराफत सिद्दिकी व पोलीस हवालदार महेश भोसले यांनी प्रतिक्षा नगर चाळ क्र. २०३ मधील राहणारे रहिवासी यांना विश्वासात घेऊन माहिती मिळवली. त्यावेळी आरोपी राहात असलेल्या चाळीतील नागरिकांची डोंगरी येथील उमरखाली परिसरात तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे समजले. त्यानुसार पोलीस पथकाने तपासले असता त्याचे नातेवाईक तेथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. तेथे माहिती घेतली असता फरार आरोपी सुर्वे बोटीवर काम करतो व तो काही दिवसांसाठीच मुंबईत नातेवाईकांकडे येतो.
हेही वाचा : ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
दिवाळीनिमित्त सुर्वे हा त्याच्या नातेवाईकांच्या घरी येणार असल्याचा पोलिसांना संशय होता. म्हणून त्यांनी तेथील घरावर पाळत ठेवली होती, परंतु तो घरी आला नाही. ८ नोव्हेंबरला सुर्वे त्यांच्या नातेवाईकांकडे येणार असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने तडीपार पथकाने उमरखाली परिसरात सापळा रचला. त्यानुसार आरोपी प्रकाश सुर्वेशी मिळता-जुळता व्यक्ती तेथे आला. त्याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी तपासणीत तो सुर्वे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वरिष्ठांना याबाबतची माहिती देऊन सुर्वेला याप्रकरणी पुन्हा अटक करण्यात आली. १९ वर्षांपासून तो पोलिसांचा ससेमिरा चुकवत होता. अखेर याप्रकरणी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.