लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या वादग्रस्त टिप्पणीबद्दल मुंबई पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली आहे. रणवीरसह अपूर्व मखीजा, समय रैना आणि ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या आयोजकांविरुद्ध मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. ‘इंडिया गॉट लेटेंट’ मधील कथित अश्लील आणि वादग्रस्त टिप्पण्यांबाबत मुंबई पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली आहे.
सोमवारी दुपारी पोलिसांची एक टीम खारमधील हैबतात बिल्डिंगमध्ये पोहोचली. तेथे कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले होते.अलाहबादियाने वादग्रस्त वक्तव्य नुकत्याच झालेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाच्या एका भागात केले होते. त्यात तो पाहुणा म्हणून उपस्थित होता. त्याच्यासह इतर लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखीजाही होते. अलाहबादियाने एका स्पर्धकाशी संभाषण करताना वादग्रस्त विधान केले. या वक्तव्यामुळे त्याच्यावर समाज माध्यमांवर टीका झाली आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. या वादग्रस्त विधानानंतर, मुंबईतील दोन वकील अशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी सोमवारी सकाळी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यात विधान अश्लील असून त्यामुळे महिलांचाही अपमान करण्यात आल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी आयोजक, ऑनलाइन प्लॅटफॉर्म, कलाकार आणि संबंधित इतरांवर गुन्हा दाखल करावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी,” असे वकील राय यांनी सांगितले.
सध्या पोलिसांनी या प्रकरणात कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही. ते याप्रकरणी चौकशी करत आहेत. याप्रकरणी उपायुक्त दिक्षीत गेदाम यांना विचारले असता आम्ही चौकशी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. पण कधीकधी, त्यातील सहभागीना वादग्रस्त प्रश्न देखील विचारले जातात. यावेळी त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यूट्यूबर्स आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा, रणवीर अलाहाबादिया उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये रणवीर अलाहाबादियाने त्याच्या पालकांबद्दल असा प्रश्न विचारला गेला. आता त्याच्यावर खूप टीका होत आहे. समाज माध्यमांवर या दोघांना ट्रोल केले जात आहे. तसेच आता त्यांच्याविरुद्ध तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. आता पोलीसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून ते याप्रकरणी चौकशी करत आहेत.