मुंबई : कंपनीच्या पावत्यांमध्ये फेरफार करून वांद्रे येथील व्यावसायिकाची सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सनदी लेखापालासह तिघांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी व्यावसायिकाने कंपनीच्या व्यवहारांचे लेखापरीक्षण केले होते. त्यात हा संपूर्ण प्रकार उघड झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. उर्वरित दोन आरोपी तक्रारदाराचे भागिदार असून कर्नाटकातील रहिवासी आहेत. तक्रारदार गुरुदत्त कामथ (५२) सुगंधी तेलाचे व्यापारी आहेत. त्यांची महामाया फ्रेग्रेन्स नावाची कंपनी आहे.

हेही वाचा >>> Mumbai University Senate Election 2024 Result: मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत उबाठा गटाच्या युवा सेनेचा डंका, अभाविपला धक्का

तक्रारीनुसार, कर्नाटकात राहणारे त्यांचे मावस भाऊ श्यामसुंदर नाईक व वसंथा नाईक यांच्यासोबत त्यांनी २००० मध्ये श्रीरक्षा फ्रेग्रेन्स नावाची कंपनी स्थापन केली होती. त्यामध्ये कामथ यांची ५० टक्के भागिदारी होती. तक्रारदार कंपनीने २०१९ मध्ये वांद्रे येथे कार्यालय सुरू केले. त्यावेळी कामथ यांची बहिण विणा कामथही त्यांना या व्यवसायात मदत करू लागली. त्यांनी आर्थिक व्यवहाराची तपासणी केली असता कंपनीला दीड कोटी रुपये नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. पण प्रत्यक्षात कागदोपत्री कंपनीला सात लाख रुपयांचा नफा झाल्याचे दिसून आले. त्यावेळी सनदी लेखापाल यज्ञा मैया यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी श्यामसुंदर नाईक व वसंथा नाईक यांच्या सांगण्यावरून सदर ताळेबंद तयार केल्याचे सांगितले. त्यानुसार तक्रारदार कामथ यांनी लेखापरीक्षण केले असता कागदोपत्री कच्चामाल व प्रत्यक्षातील कच्चामाल यात तफावर आढळून आली.

हेही वाचा >>> परराज्यातून आयुर्वेद पदवी घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्य कोट्यातून प्रवेश

कच्च्या मालाच्या नोंदी योग्य पद्धतीने करण्यात आल्या नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच ठरावीक शेतकऱ्यांकडूनच कच्च्यामालाची खरेदी करण्यात आलेली दिसून आले. तसेच तक्रारदाराच्या वैयक्तीत ठेवी कर्ज फेडीसाठी वळते करण्यात आले. त्यानुसार तक्रारदार कामथ यांचे सहा कोटी रुपायांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कामथ यांच्या तक्रारीवरून सनदी लेखापालासह दोन भागिदारांविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.