मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे केलेल्या आंदोलनाप्रकरणी बीकेसी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. बेकायदेशीर जमाव जमा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाच्या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकवून आंदोलन केले होते. मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष प्रणील नायर, मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष अखिलेश यादव, महिला सरचिटणीस सन्ना कुरेशी, रोशना शहा यांच्यासह एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना कलम ४५ (१) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी कलम २२३, १८९ (१) (२), १९०, ३७ (१), ३७ (३) व १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईमधील वांद्रे – कुर्ला संकुलातील जिओ सेंटरमधील ग्लोबल फिनटेक कार्यक्रमाला शुक्रवारी नरेंद्र मोदी उपस्थित होते, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शहरात काही ठिकाणी पंतप्रधानांविरोधात फलक लावले होते. यावेळी काँग्रेस नेते, कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलिसांनी काँग्रेसच्या अनेक नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
हेही वाचा…१९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरण, मेमनच्या कुटुंबाची मालमत्ता केंद्राकडे
यावेळी माजी मंत्री नसीम खान यांना घरामध्येच नजरबंद करण्यात आले होते. तसेच अस्लम खान, भाई जगताप आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी इमारतीमधून बाहेर पडू न दिल्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी इमारतीखालीच धरणे आंदोलन सुरू केले. या ठिकाणी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. त्यानंतर वर्षा गायकवाड आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना शिवाजी पार्क परिसरात नेण्यात आले. पोलिसांनी काही वेळानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना सोडून दिले.