मुंबई : लालबाग येथून सव्वाकिलो सोन्याचे दागिने घेऊन पळालेल्या आरोपीला काळाचौकी पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली. आरोपी गेल्या महिन्याभरापासून पोलिसांचा ससेमिरा चुकवत होता. अखेर पोलीस पथकाने राजस्थानमधून त्याला अटक केली. जितेंद्र परमाशंकर मिश्रा यांचा लालबागमधील नारायण उद्योग भवनमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करण्याचा व्यवसाय आहे. तेथे काम करणारा कामगार कानाराम उर्फ प्रवीण जाट १० फेब्रुवारी रोजी ११२५ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला होता.
हेही वाचा : मुंबई : रेल्वे स्थानकांतील थ्रीडी सेल्फी बूथ, पॉइंट्स हटवले; रेल्वे स्थानकांनी घेतला मोकळा श्वास
पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासले. त्यात आरोपीने मोबाइलमधील सीमकार्ड फेकून दिल्याचे, तसेच तो टॅक्सीने जात असल्याचे दिसले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टॅक्सी चालकाचा शोध घेऊन त्याच्याकडून आरोपीबाबतची माहिती मिळविली. आरोपी राजस्थानमध्ये जात असल्याचे त्यांना समजले. अखेर पोलिसांनी राजस्थानमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपी मूळचा राजस्थानमधील बाली तालुक्यातील रहिवासी आहे.