मुंबई : सांस्कृतिक वारसा लाभलेल्या विलेपाल्र्यासह मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांना समोरे जावे लागते. या समस्या कशी दूर करता येतील? एकटया राहणाऱ्या ज्येष्ठांच्या सुरक्षेचे काय? कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान पोलीस कसे पेलतात, आदी विषय थेट मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडून जाणून घेण्याची संधी पार्लेकरांना मिळणार आहे. ‘लोकसत्ता’ आयोजित शहरभान’ या कार्यक्रमात आज सायंकाळी ६.३० वाजता लोकमान्य सेवा संघ, टिळक मंदिर येथे पोलीस आयुक्तांशी संवाद साधता येईल.
मुली आणि महिलांच्या सुरक्षेचे काय? बदलत्या सामजिक वातावरणात शहरातील कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान पोलीस कसे पेलणार? याविषयी नागरिकांना पोलिसांची भूमिका समजून घेता येईल.
हेही वाचा >>> सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात कायद्याचा अडथळा; वडिलांकडील रक्तसंबंधातील नातेवाईकांनाच जात वैधता प्रमाणपत्र देण्याची तरतूद
पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते. विमानतळ परिसरात नेहरू रस्ता तसेच सहार रस्त्यावर सायंकाळी वाहतूक कोंडीमध्ये वेळ वाया जातो. पार्लेश्वर मंदिराकडून पूर्व-पश्चिम प्रवास करतानाही वाहतूक मंदावते. उपनगरात विविध ठिकाणी चाललेल्या विकासकामांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवतो. पाल्र्यात वाहनतळाचीही समस्या आहे. याशिवाय, अन्य समस्या पोलिसांच्या मदतीने कशा सोडवता येतील, हे पार्लेकरांना जाणून घेता येईल.
शहर सुस्थितीत ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या विविध यंत्रणांचे प्रमुख आणि नागरिकांमध्ये संवाद घडवण्याच्या उद्देशाने ‘लोकसत्ता शहरभान’ हा उपक्रम आयोजित केला जातो. शहरातील शांतता अबाधित राहावी यासाठी दक्ष असणाऱ्या पोलीस यंत्रणेशी संवादाचे हे पर्व आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
मुंबईतील हत्या, जबरी चोरी, विनयभंग, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये या वर्षी कमालीची घट झाल्याचे दिसते. गेल्या वर्षीच्या आकडेवारीशी तुलना केल्यास मुंबईतील गंभीर गुन्ह्यांमध्ये ३९ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आउट’सह अनेक मोहिमा राबवल्या आहेत. याशिवाय माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचण्याच्या प्रतिसाद कालावधीतही गेल्या काही वर्षांमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. त्याचा मुंबई पोलिसांना कसा फायदा झाला? तसेच मुंबईतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस कोणती पावले उचलणार आहेत, अशा अनेक मुद्दयांवर पोलीस आयुक्त फणसळकर संवाद साधतील.