मुंबई : नववर्षांच्या पूर्वसंध्येला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री शहरात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबवले. या कारवाईत पोलिसांनी २९ फरारी आणि पाहिजे असलेल्या आरोपींना अटक केली. तब्बल २५२ ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली असून आठ हजार ६९० वाहनांची तपासणी करण्यात आली. मोहिमेत दोन हजार ३०० वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर, ६० मद्यपी चालकांवर  कारवाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री ११ वाजता अचानक ‘ऑल आऊट ऑपरेशन’ मोहीम सुरू केली. रात्री ३ वाजेपर्यंत ती सुरू होती. यावेळी पाच प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, १३ पोलीस उपायुक्त, ४१ साहाय्यक पोलीस आयुक्त आणि ९३ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  त्यांच्या क्षेत्रात विशेष मोहीम राबविली.

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पोलीस ठाणे, नाकाबंदी आणि शोध मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी भेट देऊन पोलिसांना मार्गदर्शन केले. या कारवाईदरम्यान पोलिसांकडून २५२ ठिकाणी शोधमोहीम राबविली. त्यात अभिलेखावरील एक हजार ३६ आरोपींची चौकशी करण्यात आली. त्यात पोलिसांना विविध गुन्ह्यांतील फरारी आणि पाहिजे असलेले २९ आरोपींना, अजामीनपात्र वॉरंट बजावले. १३१ जणांना, तसेच एनडीपीएस कलमांतर्गत १६४ जणांना अटक करण्यात आली. अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ३१ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडील शस्त्रे जप्त करण्यात आली. सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत २२३ ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. त्यात अभिलेखावरील एक हजार हजार ४७१ आरोपींची चौकशी करण्यात आली. या मोहिमेत २७१ आरोपी सापडले. त्यांच्याविरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली.

सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १७८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात आठ हजार ६९० दुचाकी आणि चारचाकी वाहने तपासण्यात आली. यावेळी मोटार वाहन कायदा कलमांतर्गत दोन हजार ३०० चालकावर कारवाई करण्यात आली.  तर, ६० वाहनचालकांविरूद्ध मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने ८७२ हॉटेल्स, लॉज परिसरात तपासणी करण्यात आली. सुमारे ७३ ठिकाणी छापे टाकून अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात ५५ जणांना अटक करण्यात आली होती. 

गेटवे ऑफ इंडिया येथे विशेष उपाययोजना..

नववर्षांच्या पूर्वसंध्येला ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर काहीकाळ बंदरात नौका उभ्या करण्यास बंदी घालावी, अशी मागणी पोलिसांनी ‘गेट वे ऑफ इंडिया’ व्यवस्थापनाकडे केली आहे. १ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत हे निर्बध लागू करावेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police conducted an all out operation in the city to prevent law and order problem zws
Show comments