विवाहित महिलेशी प्रेमसंबंध ठेवून तिला गर्भवती केल्याच्या आरोपांप्रकरणी एका हवालदाराला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलीस प्रशासनाने हवालदारावर कारवाई केली आहे. या हवालदाराबरोबरच्या संबंधातून महिलेने एका मुलाला जन्म दिला आहे. हा हवालदार मुंबईच्या ताडदेव येथील शस्त्र विभागात तैनात होता. सोमनाथ बाबुराव अंगुले असं या हवालदाराचं नाव असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे.
पोलीस सूत्रांच्या हवाल्याने इडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यात म्हटलं आहे की, सोमनाथ अंगुले २०१९ मध्ये मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात तैनात होते. येथील पोस्टिंगच्या काळात त्यांचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध सुरू झाले. या प्रेमसंबंधातून ती महिला गर्भवती झाली. त्यानंतर तिला एक मूलही झालं. अंगुले यांनी तिला लग्न करण्याचं वचन दिलं होतं.
सोमनाथ अंगुले आणि ती महिला प्रेमसंबंधात असताना अंगुले यांनी त्या महिलेबरोबर १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बनवण्यात आलेल्या करारावर स्वाक्षरी केली होती. ते एकमेकांबरोबर लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहतील असा करार दोघांनी केला होता. परंतु, दोघांचे प्रेमसंबंध फार काळ टिकले नाहीत. त्यामुळे पीडित महिलेने अंगुले यांच्या वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली. या तक्रारीनंतर अंगुले यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा >> मुंबईतील म्हाडाच्या इमारतीला भीषण आग, १३५ नागरिकांची सुखरुप सुटका
यासंदर्भात अंगुले यांची विभागीय चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या काळात त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. परंतु, चौकशीदरम्यान अंगुले यांच्यावर महिलेने केलेल्या आरोपांमध्ये ते दोषी आढळले. त्यामुळे ताडदेव पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी अंगुले यांना पोलीस सेवेतून बडतर्फ केलं आहे.