मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफला मारण्यासाठी दोन लाख व हत्यार पुरवल्याचा दूरध्वनी मुंबई नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्याने खळबळ उडाली. पंजाबमधील ३५ वर्षीय व्यक्तीने हा दूरध्वनी केला होता. या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीने टायगर श्रॉफला मारण्याचा कट सुरक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रचल्याची खोटी माहिती दिली आहे. या प्रकरणी खार पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत आहे.
सोमवारी मिळाला संदेश…
अभिनेता टायगर श्रॉफला मारण्याचा कट रचण्यात येत असल्याचा दूरध्वनी सोमवारी मुख्य नियंत्रण कक्षाला आला होता. मनिष कुमार सुजिंदर सिंह (३५) नावाच्या व्यक्तीने हा दूरध्वनी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ‘ट्रीग’ या सुरक्षा कंपनीचा एक ब्रांच हेड व एक एरिया ऑफिसर यांनी सिनेअभिनेता टायगर श्रॉफला मारण्यासाठी दोन लाख रुपये व हत्यार दिल्याचा दूरध्वनी सोमवारी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता.
आरोपीने जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन कंपनीची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासणी निष्पन्न झाल्यानंतर उपनिरीक्षक प्रशांत बोरसे यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी सोमवारी भारतीय न्याय संहिता कलम ३५३(२), २१२, २१७ अंतर्गत, सामान्य नागरिकांमध्ये द्वेष भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मनिष कुमार सिंह याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत आहे. त्याच्या अटकेनंतर त्याने हा प्रकार का केला याबाबतची माहिती स्पष्ट होऊ शकेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
अफवांचे पेव
गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमकी व खोटी माहिती देणारे किमान शंभरहून अधिक संदेश अथवा दूरध्वनी प्राप्त झाले आहेत. याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे कानाडोळाही करता येत नाही. त्यामुळे सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. खूप प्रयत्न केल्यानंतर धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे याप्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांना नाहक त्रास
पोलिसांना सुरक्षा, बंदोबस्त, तपास कामासह अशा अफवांनाही नेहमी सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर अनेक मिसकॉलही येत असतात. ते नेमके कोणाकडून आले, हे पडताळण्यासाठी त्यांवर पुन्हा दूरध्वनी केल्यावरही अजब उत्तरे ऐकायला मिळतात. अनेक जण दूरध्वनी सुरू आहेत का, याची खात्री करण्यासाठी दूरध्वनी करतात. वैयक्तिक वाद, आर्थिक वाद, प्रेमप्रकरणे यातून एकमेकांना अडवकण्यासाठीही दूरध्वनी करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीनंतही पोलिसांना नियमित येणाऱ्या सर्व दूरध्वनींची पडताळणी करावी लागते. प्रश्न सुरक्षेचा असल्यामुळे त्याबाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे तपासासोबत सुरक्षा यंत्रणांना अशा अफवांशीही दोन हात करावे लागतात. त्यामुळे या अफवा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.