मुंबईः मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात बुधवारी रात्री एका महिलेने दूरध्वनी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची तयारी सुरू असून त्यांच्याकडे शस्त्र असल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने दूरध्वनी बंद केला. हा दूरध्वनी आल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली. सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले. त्यानंतर महिलेला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण उत्तर मिळाले नाही. अखेर या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आणि तातडीने फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. दरम्यान, दूरध्वनी करणाऱ्या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी मुंबईच्या आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत. प्राथमिक तपासात महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे निष्पन्न झाले आहे. ही महिला ३४ वर्षांची असून पोलीस तिची चौकशी करीत आहेत. निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी देणारा फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्यावर्षीही अफवांचे सुमारे १०० दूरध्वनी मुंबई पोलिसांना आले होते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अशा धमक्यांच्या दूरध्वनीने शंभरी गाठली होती. नुकतीच रिझर्व बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा दूरध्वनी आला होता. हा दूरध्वनी रिझर्व बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर आला होता. फोनवर असलेल्या व्यक्तीने स्वतःला ‘लश्कर-ए-तैयबा’चे सीईओ असल्याचा दावा केला. ‘बँक बंद करा. मोटरगाडी धडक देणार आहे’, अशी आरोपीने धमकी दिली होती. हा खोडसाडपणा असल्याचा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरण: घटनेच्या दिवशी आरोपी चेतन सिंह याचे वर्तन विक्षिप्तपणाचे

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या लग्नात बॉम्ब असल्याचे ट्वीट करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली होती. हे ट्वीट १३ जुलै रोजी करण्यात आले होते. त्याशिवाय मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून असलम अली कराची, पाकिस्तानमधून ३५० किलो आरडीएक्स घेऊन मुंबईत आला आहे. तो महालक्ष्मी, विमानतळ आणि इतर रेल्वे स्थानाकांवर आरडीएक्स ठेवणार असल्याचाही दूरध्वनी आला होता. तोही खोटा असल्याचे निष्पन्न झाले होते. अभिनेता सलमान खान व शाहरुख खान यांनाही धमकीचे संदेश व दूरध्वनी मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही मारण्याची धमकी देणारा संदेश पोलिसांना प्राप्त झाला होता.