‘डाव्या’ व आंबेडकरी विद्यार्थी संघटनांचा आरोप; वरळीऐवजी टिळकनगरच्या शाळेत मेळावा
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याच्या आज, शनिवारी मुंबईत होणाऱ्या सभेच्या पाश्र्वभूमीवर शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे, कन्हैयाच्या सभेला विरोध करण्यासाठी कडव्या हिंदुत्ववादी संघटना समाजमाध्यमांतून आवाहने करत असताना कन्हैया समर्थक डाव्या आणि आंबेडकरी विचाराच्या विद्यार्थी संघटनांनी पोलीस यंत्रणादेखील या सभेत मोडता घालत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांच्या दबावामुळेच वरळी येथील शिक्षण संस्थेने विद्यार्थी मेळाव्याला दिलेली परवानगी नाकारली, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.
कन्हैया कुमार याच्यासह देशभरातील विविध विद्यापीठांमधील डाव्या, समाजवादी व आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थी नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी वरळीतील जनता शिक्षण संस्थेच्या शाळेत होणार होता. परंतु या परिसराची ‘भौगोलिक’ स्थिती पाहता हा मेळावा सुरक्षेच्या कारणास्तव शाळेत घेता येणार नाही, असे पत्र संस्थाचालकांनी गुरुवारी आयोजकांना दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मेळाव्याकरिता दुसरे ठिकाण शोधावे लागले. अखेर चेंबूर टिळकनगर येथील आदर्श विद्यालयात हा मेळावा घ्यायचा निर्णय विद्यार्थी संघटनांनी घेतला. या सगळ्या घडामोडींची माहिती देण्याकरिता शुक्रवारी तातडीची पत्रकार परिषद घेत आयोजनात आलेल्या अडचणींचा पाढा या विद्यार्थी नेत्यांनी वाचला.
‘टिळकनगरच्या शाळेने मेळाव्याकरिता परवानगी दिली आहे. परंतु या संदर्भातील ना हरकतीचे पत्र पोलीस दुपापर्यंत स्वीकारत नव्हते,’ असे धनंजय कानगुडे याने सांगितले. ‘खरे तर बंद सभागृहात सभा घेण्याकरिता पोलिसांची परवानगी लागत नाही. परंतु या मेळाव्याविषयी काही जातीयवादी गटांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे आम्हाला मेळाव्याबाबत पोलिसांना माहिती देणे गरजेचे वाटते. परंतु आम्हाला प्रतिसाद देत नसल्याचा आरोप त्याने केला. एसएफआय, एआयएसएफ, एआयएसए, छात्रभारती, एआयडीएसओ, पीव्हीएस, पीव्हीएस, डीवायएफआय, एआयवायएफ या विद्यार्थी संघटनांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
‘एका बाजूला विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या मेळाव्याला विशेषत: कन्हैया कुमार याच्याविरोधात भूमिका घेत परवानगी नाकारावी, अशी मागणी केली आहे. परंतु आमचा लढा जातीयतेविरोधात, घटनेतील मूलभूत तत्त्वांची पायमल्ली करू पाहणाऱ्यांविरोधात आहे. तसेच, आम्ही लोकशाही पद्धतीने हा आमचा लढा उभारू इच्छितो. त्यात पोलिसांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन एआयएसएफ राज्य उपाध्यक्ष शंबूक उदय याने सांगितले.
दरम्यान, या कार्यक्रमाला पोलिसांनी घातलेल्या जाचक २४ अटींमुळे शाळेने ना हरकत पत्र देण्याचे टाळले, अशीही चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू होती. परंतु शुक्रवारी दुपारी पोलीस दलानेही आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतर कार्यक्रमांना पोलीस संरक्षण पुरविते, अशी भूमिका स्पष्ट केली.
हिंदुत्ववादी संघटनांचा प्रचार
कन्हैयाच्या सभेला विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार प्रचार सुरू केला होता. समाजमाध्यमांच्या मदतीने सरकार आणि पोलिसांवर दबाव आणून हा कार्यक्रम होणार नाही, याचा प्रयत्न होत आहे. वरळी येथे होत असलेल्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारावी यासाठी दादर पोलीस ठाण्यात फोन करा, अशा प्रकारचा संदेशही व्हॉट्सअॅपवर फिरवला जात होता. मात्र, वरळीतील शाळेने कन्हैयाचा कार्यक्रम आयोजित करण्यास नकार दिल्याने काही फोन वगळता कोणीही पोलीस ठाण्यात फोन केले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा