मुंबई : गुन्हे शाखेने सोलापूर येथे उद्ध्वस्त केलेल्या मेफेड्रोनच्या कारखान्याप्रकरणी पैसे पुरवणाऱ्या एका संशयीताला अटक केली. रामागौड चंद्रयागौड इदागी उर्फ राजू गौड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो शेंकी केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांपैकी एक आहे. नाशिक पाठोपाठ सोलापूरमधील मेफेड्रोनचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात गुन्हे शाखेला यश आले होते. याप्रकरणी राहुल किशन गवळी आणि अतुल किशन गवळी या दोन भावंडाना अटक करण्यात आली आहे. दोघेही पूर्वी रासायनिक कारखान्यात काम करायचे. यातूनच त्यांनी एमडी तयार कारण्यासंबंधिची माहिती मिळाली.
हेही वाचा : तरूणीची समाज माध्यमांवर बदनामी करणाऱ्याला आसाममध्ये अटक; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
यातूनच सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसी परिसरातील २१ हजार चौरस फुटाच्या जागेत उभारलेला कारखाना भाड्याने घेतला. तेथेच तीन प्रयोगशाळा उभारून एमडी बनविण्यास सुरुवात केली. गेल्या सात – आठ महिन्यांपासून त्यांचा हा कारखाना सुरू होता. ऑक्टोबर महिन्यात गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्त्वात हा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या दोघांना अटक करण्यात आली. या कारखान्यामध्ये सुमारे तीन किलो तयार मेफेड्रोन (एमडी) सापडले होते. त्याची किंमत ६ कोटी १ लाख २० हजार रूपये इतकी आहे. या कारखान्यामध्ये अंदाजे १०० कोटी रूपये किंमतीचा सुमारे ५० ते ६० किलो कच्चा मालही सापडला होता.
हेही वाचा : मलबार हिल जलाशयाच्या पाहणीसाठी मुंबई शहर भागात १० टक्के पाणीकपात
याच भावंडांच्या चौकशीतून गौडची माहिती मिळताच त्यालाही अटक करण्यात आली. गौड हा तेलंगणामधील रहिवासी आहे. त्याने यामध्ये ६० लाखांची गुंतवणूक केली होती. एमडी बनविण्यासाठी तो वेळोवेळी गवळी भावंडाना पैसे पुरवत होता. आरोपींना २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर यापूर्वी मोहोल पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत होताच त्याचा ताबा घेत त्याला अटक करण्यात आली.