मुंबई: मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री लोकल विस्कळीत झाली आणि कार्यालयीन काम आटोपून घरी निघालेल्या असंख्य कर्मचाऱ्यांची कोंडी झाली. परिणामी, लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीमुळे लोकलमधून पडून एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. तब्बल सहा ते सात तास सदर पोलीस शिपाई गंभीर अवस्थेत रेल्वे रुळालगत पडून होता. मुसळधार पाऊस आणि गर्दीमुळे वेळीच मदत मिळू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमित ज्ञानेश्वर गोंदके (२८) असे या पोलीस शिपायाचे नाव असून ते अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे लोकल सेवा कोलमडली. याचदरम्यान गोंदके कर्तव्य बजावून डोंबिवली येथील घरी जाण्यासाठी निघाले होते. अंधेरी येथून दादर आणि नंतर डोंबिवलीला रात्री ११ च्या सुमारास जाणारी लोकल त्यांनी पकडली. प्रचंड गर्दी असल्यामुळे ते लोकलच्या दरवाज्यात उभे होते. मात्र गर्दीच्या रेट्यामुळे भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकांदरम्यान ते लोकलमधून खाली पडले.

हेही वाचा – मुंबई : टाटा रुग्णालयातील प्रोटॉन उपचार पद्धती रुग्णांसाठी वरदान

गोंदके रात्रभर गंभीर अवस्थेत रेल्वे रुळालगत पडून होते. गर्दी आणि मुसळधार पावसामुळे या अपघाताची माहिती वेळीच मिळू शकली नाही. रेल्वे रुळालगत कोणीतरी पडल्याचे गुरुवारी सकाळी एका प्रवाशाच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती कुर्ला लोहमार्ग पोलिसांना दिली. कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गोंदके यांना तत्काळ मुलुंडमधील अगरवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – पुणे, कोल्हापूर, सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाच हजार घरांच्या सोडतीसाठी जाहिरात

रेल्वे रुळालगत पोलिसांना गोंदके यांची बॅग मिळाली. यामध्ये गोंदके यांचा पोलीस गणवेश आणि ओळखपत्र सापडले. त्यावरून त्यांची ओळख पटली. कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी याबाबतची माहिती अंधेरी लोहमार्ग पोलिसांना दिली. गोंदके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज असून याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.