बांधकाम व्यवासयिक ललित टेकचंदानी यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ललित टेकचंदानी यांच्यावर तळोजा येथील प्रकल्पात घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी नऊ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ललित टेकचंदानी यांना अटक करण्यात आली. टेकचंदानी यांनी गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ANI या वृत्तसंस्थेने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ललित टेकचंदानी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक

ललित टेकचंदानी हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. मुंबईतल्या बांधकाम क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आहे. मात्र ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा आता त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी नऊ तास त्यांची याच प्रकरणात चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक केली. कलम ४२० आणि ४०६ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६० ग्राहकांची ४४ कोटी रुपयांना फसवणूक केल्याचं हे प्रकरण आहे.

हिरा जाधवानी यांची तक्रार

चेंबूर येथील हिरा जाधवानी यांच्या तक्रारीनुसार सुप्रीम डेव्हलपर्स प्रा. लिमिटिडेचे ललित टेकचंदानी, काजल टेकचंदानी, अरुण माखीजानी, हसन इब्राहीम आणि सुप्रीम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे आजी-माजी संचालक, भागीदार आणि प्रमोटर्स यांनी प्रकल्पात घर देण्याच्या नावाखाली ७३ लाख ६० हजार रुपये घेऊन घराचा ताबा दिला नसल्याची तक्रार समोर आली होती. त्यानंतर इतरही तक्रारी आल्या. ज्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. मंगळवारी ललित टेकचंदानी यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

टेकचंदानी हे एकेकाळी छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय होते

ललित टेकचंदानी हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. छगन भुजबळ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना ललित टेकचंदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागातले निर्णय टेकचंदानी यांना विश्वासात घेऊन घेतले जात होते अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती. ललित टेकचंदानी आणि छगन भुजबळ यांचे दहा वर्षे उत्तम संबंध होते. २०१४ मात्र या दोघांमध्ये वितुष्ट आलं होतं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police eo wing arrested builder lalit tekchandani in a cheating case after a nine hour interrogation scj