बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याविरोधातील कारवाईमुळे केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या चर्चेत आहेत. दरम्यान समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली होती. याप्रकरणी वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची भेटदेखील घेतली होती. दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार समीर वानखेडेंनी केली होती. त्यावर आता मुंबई पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली होती. याप्रकरणी वानखेडे यांच्यासह एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची भेट घेतली व दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली होती.
काही लोक माझ्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत, असे वानखेडे यांनी जैन आणि पांडे यांना सांगितले होते. यानंतर दोन जण वानखेडे यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्या मागावर असल्याचे कथित सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. हे प्रकरण फार गंभीर आहे असे सांगत वानखेडे यांनी यावर थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता.
त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यातील गुप्तहेरांकडून त्यांची हेरगिरी केली जात असल्याच्या तक्रारीत तथ्य नाही असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. तसेच दोन पोलीस ओशिवरा स्मशानभूमीत वाहन चोरीच्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यासाठी गेले होते अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, आर्यन खान प्रकरणात वादात सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मंगळवारी दिल्लीतील ‘एनसीबी’च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर आपली बाजू मांडली. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करण्यात येणार असून, त्यासाठी चार वरिष्ठ अधिकारी बुधवारी मुंबईला रवाना होणार असल्याचे समजते. या चौकशीमुळे वानखेडे यांच्या बदलीची शक्यता वर्तवली जात आहे.