मुंबई पोलीस दलातील पदांच्या उतरंडीत चालक पद अगदीच खालच्या श्रेणीवर. अधिकाऱ्यांसाठी कार्यालयांबाहेर तिष्ठत राहण्यापासून त्यांचे टक्केटोणपे खाण्याच्या या पदापासून आता अनेक पोलीस फारकत घेऊ लागले आहेत. मुंबई पोलीस दलात सध्या वाहनचालकांची कमालीची टंचाई निर्माण झाली असून तब्बल ९५० चालकांची पदे रिक्त असून गेल्या आठ वर्षांपासून चालक पदाची भरती बंद असल्याने येत्या काळात ही टंचाई येत्या काळात आणखी उग्र होण्याची चिन्हे आहेत. त्यातच, या रिक्त जागा भरून काढण्यासाठी सशस्त्र दलातील पोलिसांना जबरदस्तीने चालकाचे काम करायला धाडले आहे. शिक्षा म्हणून बदली करा, पण हे काम देऊ नका, अशी विनवणीच चालक करू लागले आहेत. चालकांच्या रिक्त पदांमुळे कामावर असलेल्या चालकांवरही कमालीचा ताण पडत आहे.
पोलीस उपायुक्त दर्जापासून वरच्या श्रेणीच्या अधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनाला पूर्णवेळ चालक असतो. तसेच, पोलिसांच्या तुकडय़ांची वाहतूक करण्यासाठीही चालकांची नियुक्ती करण्यात येते. मुंबई पोलीस दलात २७९७ चालकांची पदे असून त्यातील अवघे १८४७ चालकच सध्या कार्यरत आहेत. रिक्त असलेल्या या ९५० जागा भरण्यासाठी ४५० पोलीस सशस्त्र दलातून मागविण्याची वेळच प्रशासनावर आली आहे.
चालकांवर अतिरिक्त ताण
चालकांचे काम पोलीस दलात अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला कमीत कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचविण्याबरोबरच पोलिसांची तुकडी घटनास्थळी पोहोचविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असते; पण रिक्त पदांमुळे सध्या कार्यरत असलेल्या चालकांवर कमालीचा ताण असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने मान्य केले. चालकांची कमतरता भरून काढण्यासाठी सशस्त्र दलातून ४५० पोलिसांना चालक म्हणून रुजू करून घेण्याची वेळ प्रशासनावर येऊन ठेपली आहे. त्यातच, मोटार वाहतूक विभागात कार्यरत असलेले अनेक चालक या कामाला कंटाळले असून शिक्षा करून बदली करा, पण चालकाचे काम देऊ नका, अशी विनवणी चालक करत आहेत.
पोलिसांनाच प्रशिक्षण
या रिक्त पदांच्या कारणांचा शोध घेतला असता, सन २००६ पासून चालक या पदाची भरतीच रद्द केल्याने ही वेळ येऊन ठेपल्याचे स्पष्ट झाले. चालकांची ही कमतरता दूर करण्यासाठी पोलिसांनाच गाडी चालविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना चालक पदावर नेमण्यासाठी पोलिसांच्या मोटार वाहतूक विभागाने २०१३ पासून स्वत:चे प्रशिक्षण केंद्रच सुरु केले आहे.