मुंबई : मुंबईसह पुण्यातील अनेक भागांमध्ये शनिवारी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारा संदेश पोलिसांना प्राप्त झाला असून आरोपीने बॉम्बस्फोट रोखण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरी आणि कुर्ला भागात २४ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजता बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी अज्ञात आरोपीने दिली आहे. त्याने या बदल्यात दोन लाख रुपयांची मागणी केली आहे. तसेच पुणे शहरातील विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याच्या धमकीचा संदेशही आरोपीने पाठवला आहे. आरोपीने उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून संदेश पाठवल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>> मुंबई: डॉक्टरचा दूरध्वनी शोधणे पडले महागात; आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक, मुख्य आरोपीकडून आतापर्यंत १८ कोटींची फसणूक
बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई, तसेच पुण्यात बॉम्बस्फोट घडविणार असल्याची धमकी आरोपीने दिली आहे. मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला या भागांमध्ये शनिवारी दुपारी बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याचे आरोपीने संदेशात म्हटले आहे. या कामासाठी आपल्याला दोन कोटी रुपये मिळाले असून तुम्ही दोन लाख रुपये दिल्यास पैसे घेऊन मलेशियाला निघून जाईन, असेही धमकीत म्हटले आहे. पोलीस याप्रकरणी आरोपीचा शोध घेत आहेत.