बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ३३ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी गोरेगाव येथील दांपत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भेटवस्तू आणि काही रोख रक्कम असे एकूण ३३ लाख रुपये उकळल्यानंतर आरोपींनी आणखी १० लाख रुपयांची मागणी केली होती. आरोपी महिलेने आपले चित्रीकरणही केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तक्रारदार रस्ते बांधणी करणाऱ्या एका कंपनीत नोकरी करतात. गेल्यावर्षी जुलै महिन्यात आरोपी महिला त्यांच्या संपर्कात आली.

हेही वाचा >>> मुंबई : मालाड येथे सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

आरोपी महिलेने आपण वेश्यव्यवसाय करत असल्याचे सांगितले. त्यानंतर ते कुर्ला येथील एका लॉजवर गेले होते. दोघेही अधूनमधून भेटत होते. त्याचदरम्यान आरोपी महिलेने तक्रारदाराचे चित्रीकरण केले. त्यानंतर प्रत्येक वेळी ती विविध कारणे सांगून महागड्या भेटवस्तू व पैसे मागू लागली. तक्रारदारांनी आतापर्यंत तिला रोख रक्कम आणि भेटवस्तूच्या स्वरुपात एकूण तिला ३३ लाख ५७ हजार रुपये दिले होते. पण त्यानंतर तिने १० लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही, तर चित्रीकरण पत्नी व नातेवाईकांना दाखवण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेचा पतीही तक्रारदाराला धमकावू लागला. १० लाख रुपये दिले नाही, तर पत्नीवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल करेन, अशी धमकी त्याने दिली. नेहमीच्या या त्रासाला कंटाळून अखेर तक्रारदाराने याप्रकरणी कुर्ला पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी महिला व तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader