मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदार सतत वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असतात. आता आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदुकीच्या धाकावर व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी राज सुर्वेंसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, १० ते १२ अज्ञातांचाही एफआयआरमध्ये उल्लेख आहे.
राजकुमार सिंह असं गुन्हा दाखल केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. राजकुमार सिंग यांनी सांगितल्यानुसार, बुधवारी गोरेगाव पूर्व येथील कार्यालयातून जबरदस्तीने त्यांना उचलून नेण्यात आलं. नंतर पाटणा येथील व्यावसायिक मनोज मिश्राला दिलेलं कर्जाचं प्रकरण मिटवण्याची धमकी देण्यात आली.
पोलीस एफआयआरमध्ये काय?
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहिसर येथील कार्यालयात नेण्यात आलं. तिथे राज सुर्वेंसह असलेल्या काही लोकांनी बंदुकीच्या धाकावर मनोज मिश्राला दिलेलं कर्ज प्रकरण मिटवण्याची धमकी दिली. तसेच, याबद्दल बाहेर कुठेही वाच्यता करू नये, असेही म्हटल्याचं राजकुमार सिंग यांनी एफआयआरमध्ये नमूद केलं.