मुंबई : बेपत्ता झालेल्या दोन १२ वर्षांच्या मुलींना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात शोध मोहीम राबवली. अखेर गस्तीवर असलेल्या पथकाला मुलींचा शोध घेण्यात अखेर यश आले. घरातून पळाल्यानंतर या मुलींनी लोकलने प्रवास केला, चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला, बागेत रात्र घालवली आणि नंतर त्या वॉटर किंगडममध्ये गेल्याचे उघडकीस आले आहे.
निर्मल नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुली खार परिसरात राहतात. जुहू चौपाटीला जात असल्याचे सांगून त्या बुधवारी घराबाहेर पडल्या. या दोघींपैकी एका मुलीने याबाबत तिच्या लहान बहिणीला सांगितले होते. मात्र, त्या रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्यांच्या पालकांनी निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी तत्काळ अनेक पथके तयार केली आणि नातेवाईक, मित्रांच्या घरी तपास केला, पण त्यांचा कुठेही शोध लागला नाही. अखेर, पोलीस नियंत्रण कक्षाने वायरलेस संदेशाद्वारे या हरवलेल्या दोन मुलींची माहिती दिली आणि सर्व गस्त पथकांना सतर्क केले.
पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले, त्यावेळी या मुलींनी प्रथम खार स्थानकातून लोकल पकडली आणि त्या बोरिवलीला गेल्याचे निदर्शनास आले. बोरिवलीतील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले असता त्यांनी चित्रपटगृहात जाऊन ‘छावा’ चित्रपट पाहिल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्या ब्रह्मकुमारी बागेत गेल्या. तेथे त्या संपूर्ण रात्र होत्या. सकाळी त्यांनी रिक्षा पकडली. पोलिसांनी त्या रिक्षाचालकाला वाहनाच्या क्रमांकावरून शोधून काढले आणि विचारपूस केली असता त्या दोघींना गोराई जेट्टीवर सोडल्याचे त्याने त्याने सांगितले. मुली वयाने लहान असल्यामुळे त्या जेट्टीवरून वॉटर किंगडममध्ये गेल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी वॉटर किंगडमच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून या मुलींची चौकशी केली. तसेच त्या तेथे आल्या आहेत का हे तपासण्यास सांगितले. पोलिसांनी वर्णन केलेल्या दोन मुली तेथे सापडल्या. पोलिसांनी त्यांना तेथून घरी आणले व पालकांच्या स्वाधीन केले.