शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी आयोजित केलेल्या चेंबूर फेस्टिवलमध्ये प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्काबुक्की झाल्याचा गंभीर प्रकार घडला. आमदार फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर यानेच ही धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत घटनेची माहिती दिली. यात त्यांनी आरोपी स्वप्निल आमदार प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा असल्याच्या माहितीला दुजोरा दिला.
हेमराज राजपूत म्हणाले, चेंबुरला लाईव्ह कॉन्सर्ट होता. तिथं गायक सोनू निगम यांनी सादरीकरण केल्यानंतर मंचावरून खाली उतरत असताना एका व्यक्तीने त्यांना पकडलं. सोनू निगम यांना पकडल्याचं पाहून त्यांच्याबरोबर असलेल्या दोघांनी आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्या व्यक्तीने सोनू निगम यांच्याबरोबर असलेल्या दोघांना मंचाच्या पायऱ्यांवरून ढकललं.”
“यावेळी सोनू निगम हेही या घटनेत पायऱ्यांवर पडले. सोनू निगम यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून स्वप्निल फातर्फेकरविरोधात चेंबूर पोलीस स्टेशनला कलम ३४१ आणि ३३७ या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत,” अशी माहिती डीसीपी राजपूत यांनी दिली.
व्हिडीओ पाहा :
राजपूत पुढे म्हणाले, “धक्काबुक्कीनंतर स्वतः सोनू निगम मंचाच्या पायऱ्यांवरून पडले. इतर दोन लोक मंचाच्या पायऱ्यांवरून खाली पडले. त्यातील एका व्यक्तीच्या खांद्याला दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु, ते उपचार करून सोनू निगम यांच्याबरोबर गेले.”
हेही वाचा : VIDEO: “बच गया, नही तो मर जाता”, धक्काबुक्कीच्यावेळी काय घडलं? स्वतः सोनू निगमनेच सांगितलं, म्हणाला…
“चेंबुरचा फेस्टिव्हल आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी आयोजित केला होता. धक्काबुक्की करणारा आरोपी स्वप्निल त्यांचा चिरंजीव आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.