हुंगून माग काढण्याबरोबरच धावण्यातही चपळ असलेल्या श्वानांचा समावेश
हुंगण्याच्या तीव्र शक्तीबरोबरच धावण्यातही चपळ असलेल्या ‘बेल्जियन शेफर्ड’ जातीच्या श्वानांचा समावेश होणार आहे. भारतीय लष्कर आणि राष्ट्रीय सुरक्षा बल (एनएसजी) या यंत्रणांमध्ये तपासकामांकरिता ‘बेल्जियन शेफर्ड’ची मदत घेतली जाते. त्याच धर्तीवर मुंबई पोलीस दलात १० बेल्जियन शेफर्ड दाखल केले जाणार आहेत.
मुंबई पोलीस दलाच्या तीन शाखांकडे २५ प्रशिक्षित श्वान आहेत. यापैकी लॅबरेडोर प्रजातीचे नऊ श्वान बॉम्बशोधक व नाशक पथकाकडे आहेत, तर श्वान पथक आणि गुन्हे शाखेकडे लॅबरेडोर आणि डॉबरमन या दोन्ही प्रजातींचे श्वान आहेत. आतापर्यंत मुंबईच्या कानाकोपऱ्यात स्फोटके, अमली पदार्थ शोधण्याची जबाबदारी शांत स्वभावाच्या, आज्ञाधारक लॅबरेडोरकडे होती, तर चपळ, काटक आणि तितकेच आक्रमक डॉबरमन गंभीर गुन्ह्य़ानंतर आरोपींचा माग काढत होते. मात्र ही दोन्ही महत्त्वाची कामे बेल्जियन शेफर्ड एकहाती करू शकतो, असा दावा पोलीस करतात. पोलीस दलाने १० बेल्जियन शेफर्ड ताफ्यात घेण्याचे ठरवले. त्यापैकी पाच श्वान दोन आठवडय़ांपूर्वी दाखल झाले. नऊ महिन्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी ते येत्या काही दिवसांत रवाना होतील. प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर यातील तीन श्वान बॉम्बशोधक-नाशक पथकाकडे आणि एक गुन्हे शाखेच्या सेवेत रुजू होईल.
जर्मन शेफर्ड, लॅबरेडॉर, डॉबरमनच्या तुलनेत बेल्जियन शेफर्ड अनेकपटीने उजवा ठरतो. मुंबईतील दमट वातावरणाशी तो व्यवस्थित जुळवून घेऊ शकतो. तसेच त्याच्या आरोग्याबाबतच्या तक्रारीही कमी आहेत, अशी माहिती पुण्यातील डॉग ब्रीडर सचिन रावते यांनी दिली.
* मुंबई पोलीस दलातील श्वान पथकाच्या ६५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच बेल्जियन शेफर्डचा वापर.
* जर्मन शेफर्ड, डॉबरमनपेक्षा आक्रमक असलेल्या बेल्जियन शेफर्डची हाताळणी महिला शिपाई करणार आहेत.
* अबोटाबाद येथे ओसामा बिन लादेनचा खात्मा करणाऱ्या अमेरिकी लष्कराच्या पथकात बेल्जियन शेफर्डचा वापर केल्याचा दावा.