महाविकास आघाडीच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. ठाकरे गटातील नेते अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजपाच्या उद्याच्या ‘माफी मांगो’ आंदोलनावरही भाष्य केलं असून त्यांना अधिकार असल्याचं म्हटलं आहे. तसंच लोकांचं लक्ष वळवण्यासाठी भाजपा मोर्चा काढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“उद्या आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. पोलिसांना सहकार्य करत आम्ही हा मोर्चा यशस्वी करु असा आमचा विश्वास आहे. शिस्तीचं पालन करावं, असभ्य वागणूक असू नये, शांततेत मोर्चा निघावा, नियोजित मार्गावरुनच मोर्चा जावा अशा साधारण अटी सर्वांसाठी असतात. अशा सर्व अटी घालून पोलिसांनी परवानगी दिली आहे,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. मोर्चात तिन्ही पक्षांचे लोक जास्तीत जास्त संख्येने असतील असंही ते म्हणाले.
हेही वाचा- मुंबई : मोर्चासाठी वाहतूक बदल
भाजपाच्या ‘माफी मांगो’ आंदोलनासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “भाजपाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण आम्ही ज्या कारणास्तव रस्त्यावर उतरत आहोत तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. महाराजांच्या बाबतीत असभ्य भाषा वापरली गेली त्याबद्दल हे आंदोलन आहे. भाजपाने लोकांचं लक्ष वळवण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे”.
“प्रत्येक पक्षाला आपला कार्यक्रम राबवण्याचा अधिकार आहे. त्यांनी आपला अजेंडा राबवावा. महाविकास आघाडीचा मोर्चा ज्या कारणासाठी निघणार आहे, तो मोठ्या प्रमाणात निघेल,” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा- हा महाराष्ट्रद्रोह नाही का? आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंना विचारणा; म्हणाले “कसले डोंबलाचे मोर्चे…”
मविआच्या मोर्चाला भाजपाकडून आंदोलनातून उत्तर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये, महाराष्ट्रातून अन्य राज्यात पळविले जाणारे प्रकल्प यांसह अनेक मुद्दय़ांवर मुंबईत महाविकास आघाडीतर्फे उद्या म्हणजेच १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आता भाजपानेही कंबर कसली आहे. भाजपाही उद्या मुंबईत ‘माफी मांगो’ आंदोलन करणार आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.