मुंबई : येत्या ७ सप्टेंबर रोजी दहिहंडी उत्सव असून या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. सुरक्षेसह छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी निर्भया पथकाला विशेष आदेश देण्यात आले असून महिलांना पाहून अश्लील टिप्पणी करण्याबरोबरच, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, फुगे उडविणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. याशिवाय वाहतुकीचे नियोजन करण्याासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर तैनात राहणार आहेत.
हेही वाचा >>> मुंबई पोलिसांना बॉम्बस्फोटाबाबत धमकीचे दोन दूरध्वनी
दहिहंडी उत्सवासाठी सरकारने घातलेल्या अटी, नियमांचे उल्लंघन न करण्याच्या सूचना देत, गोविंदांना सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच दहीहंडी उत्सवातील गर्दीत साध्या वेशातील पोलीस सहभागी होणार असून परिसरात घडणाऱ्या सर्व घटनांवर त्यांचे बारीक लक्ष असणार आहे. दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार असून, शहरातील तब्बल पाच हजार सीसी टीव्ही कॅमऱ्यांसह वॉच टॉवरच्या मदतीने पोलीस सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि जवानांसह केंद्रीय व राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक, राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), शिघ्रकृती दल, फोर्सवन, बॉम्ब शोधक व नाशक पथक तैनात ठेवण्यात आले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीस गर्दीत सहभागी होणार आहे. त्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. निर्भया पथकांना महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. दहीहंडी उत्सवात सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी फेकणे, अश्लील बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील टिप्पणी तसेच, गैरवर्तन, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी किंवा फवारे, रंग किंवा पावडर फेकण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.