मुंबई पोलिसांकडून गुरूवारी तीन डान्सबारना परवाने देण्यात आले. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा डान्सबार सुरू होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या जाचक अटींविरोधात आणि डान्सबारचे पुन्हा परवाने मिळावे यासाठी डान्स बार मालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबईतील ८ डान्सबारना तातडीने परवाने देण्यात यावेत, असे निर्देश दिले होते. त्यानुसार आज ‘इंडियाना’, ‘साईप्रसाद’ आणि ‘एरो पंजाब’ या डान्सबारना मुंबई पोलिसांकडून परवाने देण्यात आले आहेत. उर्वरित पाच डान्सबारना परवान्याची रक्कम जमा करताच, डान्स बार सुरु करण्याचा परवाना देण्यात येणार आहे. डान्स बारसंदर्भात राज्य सरकारनं एकूण २७ नियम तयार केले आहेत.
डान्स बारला परवानगी देताना ते सुरूच राहू नयेत, अशा प्रकारे कठोर निर्बंध लादण्याची तरतूद असलेले विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले आहे. राज्य सरकारने सुरुवातीला २६ अटी आणि त्यानंतर नवा कायदा आणल्यामुळे राज्यात डान्सबार सुरू होणे कठीण असल्याचेच दिसून येत होते.