संसदेवरील हल्ल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचे महत्त्व अधोरेखित झाले आणि विधानभवन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले गेले. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामार्फत अधिवेशनाच्या काळात विधान भवन परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवले जाते. हे कॅमेरे बसविण्यात आले असल्यामुळे सीसीटीव्ही फुटेजची गुणवत्ता चांगली असल्याचा दावा केला जात असला पोलिसांना या कॅमेऱ्यांच्या तांत्रिक अंगाची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेज पाहताना काळोख असल्यामुळे चित्र अस्पष्ट दिसत असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले. मात्र या घटनेमुळे आता विधान भवन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गुणवत्ता तपासण्याची शक्यता निर्माण झाल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले. विधान भवनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिसांकडेच असते. जर या कॅमेऱ्यांची दिशा योग्य नसेल वा त्याची गुणवत्ता चांगली नसेल तर त्यांनी याबाबत तक्रारी का केल्या नाहीत, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, विधिमंडळासह महत्त्वाच्या शासकीय इमारतींमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम प्राधान्याने करावे. विधिमंडळात अध्यक्ष व सभापतींच्या परवानगीने त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे.

Story img Loader