मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शांतता तसेच सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार आता मुंबईत ८ एप्रिलपर्यत पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव असेल. या काळात ध्वनीवर्धकाचा वापर, बँड, तसेच फटाके फोडण्यासदेखील बंदी असेल. मुंबईच्या पोलीस उपायुक्तांनी तसे आदेश दिले आहेत.
जमावबंदीच्या आदेशामध्ये काय आहे ?
मुंबईत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू केली असली तरी त्यामागे नेमके कारण काय आहे ? असा प्रश्न विचारला जातोय. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेदेखील मुंबई पोलिसांनी म्हटलंय. “बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. यानुसार ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यास मनाई असेल. मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगीतीय बँड, फटाके फोडण्यास प्रतिबंध असेल,” असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.
तसेच बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ८ एप्रिलपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणीय वापरांवर (Flying Activities)बंदी घालण्यात घालण्यात आली आहे. तसा आदेश पोलीस उपआयुक्तांनी जारी केला आहे.