मुंबई : मुंबईत गणेशोत्सव सणानिमित्त अनंत चतुर्दशी दिवशी हजारो सार्वजनिक व घरगुती गणपतींचे विसर्जन होईल. त्यामुळे सर्व भाविकांना योग्यप्रकारे विसर्जन करता यावे, गर्दीचे नियोजन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलीस दलाकडून ८ अपर पोलीस आयुक्त, २५ पोलीस उप आयुक्त, ४५ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह २,८६६ पोलीस अधिकारी व १६,२५० पोलीस अंमलदार तैनात केलेत.
हेही वाचा >>> काकू भडकल्या ना राव! तरुणीच्या थेट कानशिलात लगावली, मुंबई लोकलमधला व्हिडीओ व्हायरल
त्यांचेसोबत इतर सुरक्षा विभाग असतील. गिरगाव, दादर, जुहू, मार्वे, आक्सा या प्रमुख विसर्जन स्थळांसह ७३ नैसर्गिक ठिकाणांव्यतिरिक्त १६२ कृत्रिम तलावाची व्यवस्था केली. त्या प्रत्येक ठिकाणी कायदा व सुव्यस्थेच्यादृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक विसर्जनाची ठिकाणे सीसीटीव्ही निगराणीखाली असून प्रमुख विसर्जनाच्या ठिकाणी ध्वनीक्षेपक यंत्रणेसह तात्पुरते नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. तसेच वाहतूक पोलीस विभागाकडून वाहतुकीचे योग्य नियोजन करून पर्यायी मार्ग उपलब्ध केले आहे. शुक्रवारी ईद-ए-मिलाद सण साजरा केला जाणार असून त्यानिमित्ताने मुंबई शहरात विविध ठिकाणी मिरवणुकांचे आयोजन केले आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून दिली.
५,२५० सुरक्षा जवान तैनात
गर्दीच्या रेल्वे स्थानक, टर्मिनसवर रेल्वे सुरक्षा बलाच्या सहकार्याने रेल्वे पोलिसांनी बंदोबस्त लावला. यात रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, गृहरक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळासह इतर सुरक्षेचे जवान तैनात असतील. असे सुमारे ५,२५० सुरक्षा जवानांचा ताफा सज्ज आहे. तसेच महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता निर्भया पथक कार्यरत केले आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्यावेळी रेल्वेगाड्यांच्या महिला राखीव डब्यात गणवेशधारी जवान असतील. रात्रीच्या सर्व रेल्वेगाड्याच्या महिला डब्यात सुरक्षा जवान कर्तव्यावर असतील, अशी माहिती वरिष्ठ लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्याने दिली.