अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंचं खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या ठिकाणी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सुरक्षेसंदर्भातील हलचालींनाही वेग आल्याचं चित्र दिसत आहे.

नक्की वाचा >> “मुझको राणाजी माफ करना असं नवनीत राणा रवी राणांना बोलणार आहेत, कारण…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई पोलिसांनी या ठिकाणी शिवसैनिकांची गर्दी आणि होणारा गोंधळ पाहता राणा दांपत्य इतरत्र आंदोलन करु शकतं अशी शक्यता व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्याची सुरक्षाही वाढवली आहे. इतकच नाही तर राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानाबाहेरही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन थेट मातोश्रीवर हनुमाना चालीसा पाठण करणार असल्याचं सांगत राणा दांपत्य आज मुंबईत दाखल झालंय. 

‘मातोश्री’ ऐवजी इतरत्र आंदोलन होण्याची शक्यता असल्यानेच ‘वर्षा’ आणि ‘सिल्व्हर ओक’वरील सुरक्षा देखील वाढवली आहे. काही दिवसांपूर्वीच सिल्व्हर ओकवर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन केलं होतं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांचं निवासस्थान असणाऱ्या या बंगल्यावर चप्पला फेकल्या होत्या. या प्रकरणामध्ये संपकरी एसटी कर्मचाऱ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली असून अन्य १०० हून अधिक जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. सिल्व्हर ओकसारखा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पोलिसांनी यंदा अधिक खबरदारी घेतलीय.

दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ‘मातोश्री’च्या बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून राणा दांपत्याला योग्य उत्तर देण्याची तयारी केली आहे. असं असतानाच अमरावतीमधून काही शिवसैनिकही राणा यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी मुंबईत दाखल झालेत.