मुंबई : समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये रमजान ईदच्या दिवशी डोंगरी परिसरात हिंदू-मुस्लिम दंगल, जाळपोळ आणि बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. या पोस्टमध्ये बेकायदेशीर रोहिंग्या, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर अशा घटनांमध्ये सहभागी होऊ शकतात, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ट्वीट करणाऱ्या व्यक्तीने नवी मुंबई पोेलिसांना टॅग केले होते. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांकडून याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलिसांना काय संदेश

पोलीस सूत्रांनुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता समाज माध्यमावर ही पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये नवी मुंबई पोलिसांच्या X अकाउंटला टॅग करण्यात आले होते.मुंबई पोलिसांनी सतर्क राहावे. ३१ मार्च ते १ एप्रिल २०२५ या काळात, डोंगरीसारख्या भागांमध्ये राहणारे काही बेकायदेशी रोहिंग्या/बांगलादेशी/पाकिस्तानी घुसखोर हिंदू-मुस्लिम दंगली, जाळपोळ आणि बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांना हा संदेश मिळताच त्यांनी त्वरित मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर, मुंबई पोलिसांनी डोंगरी परिसरात गस्त वाढवून सुरक्षेत अधिक वाढ केली आहे. तसेच नागरिकांना अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही करण्यात येत आहे.

पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीसांकडून डोंगरी भागात शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र काही संशयास्पद आढळले नाही. दरम्यान, सायबर सुरक्षा कक्षाने धमकी देणाऱ्याचा शोध तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी एक्स कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची माहिती मागवण्यात आली आहे. कोणत्याही अनुचित घटनेला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिस पूर्ण सज्ज असल्याचे पोलिसांकडून आश्वस्त करण्यात आले आहे.

अफवांचे पेव

गेल्यावर्षीही अफवांचे सुमारे १०० दूरध्वनी मुंबई पोलिसांना आले होते. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अशा धमक्यांच्या दूरध्वनीने शंभरी गाठली होती. रिझर्व बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा दूरध्वनी आला होता. हा दूरध्वनी रिझर्व बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर आला होता. फोनवर असलेल्या व्यक्तीने स्वतःला ‘लश्कर-ए-तैयबा’चे सीईओ असल्याचा दावा केला होता. . अभिनेता सलमान खान व शाहरुख खान यांनाही धमकीचे संदेश व दूरध्वनी मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही मारण्याची धमकी देणारा संदेश पोलिसांना प्राप्त झाला होता. एका महिलेनेही यापूर्वी ३० हून अधिकवेळा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून खोटी माहिती दिली आहे. त्यामुळे पोलिसांना अशा दूरध्वनींमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. गेल्यावर्षी विमानांबाबत धमक्यांचे देशभरात २०० हून अधिक संदेशप्राप्त झाले होते. ऑक्टोबरच्या १५ दिवसांतच ७० हून अधिक धमकीचे संदेश प्राप्त झाले होते. आयपी अॅड्रेसनुसार काही संदेश लंडन, जर्मनी व फ्रान्स येथील असल्याचे निष्पन्न झाले होते. पण आरोपी त्यासाठी व्हीपीएन सुविधेचा वापर करत असल्याचा संशय आहे.