पाकिस्तानी कलाकरांना धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्र नव निर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. जम्मू-काश्मीरमधील उरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेधार्थ मनसेने पाकिस्तानी कलाकाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना ४८ तासांत भारत सोडून जा अन्यथा मनसे शैलीत धडा शिकवू अशी धमकी दिली होती. मनसेच्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर या नोटीसच्या माध्यमातून सार्वजनिक शांततेचा भंग न करण्याची ताकीद पोलिसांनी मनसेला दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी आपले कार्य केले असून मुंबईमध्ये कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला काम करु देणार नाही, असा पुनरुच्चार करत खोपकर यांनी नोटीस मिळाल्यानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानी कलाकारांना दिलेला अल्टिमेट संपल्यानंतर लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचेही खोपकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे रविवारी मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.
पाकिस्तानी कलाकारांना येत्या ४८ तासांत भारत सोडून जाण्याचे इशारे देण्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) दुसरा काही उद्योग नसल्याची टीका भाजपने केली होती. भावना आणि प्राधान्याच्या गोष्टींमध्ये फरक ठेवला पाहिजे. सध्या देशभरात पाकिस्तानविरोधी भावना असून अनेक लोकांना सध्याच्या घडीला पाकिस्तानी लोक भारतीय भूमीवर असणे सहन होणारे नाही. याउलट प्राधान्यक्रमाचा विचार करायचा झाल्यास सरकारने हवाई दल, पोलीस आणि एनएसजी यांच्याशी सहकार्य करून मुंबईला दहशतावादाच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. मात्र, अशावेळी काही राजकीय पक्ष केवळ लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने नाटक करत असतील तर ते दुर्देवाचे आहे. अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या शायना एन.सी यांनी दिली होती.
Mumbai police issues notice to MNS’s Amay Khopkar asking him not to get involved in any act which can cause disturbance in public.
— ANI (@ANI_news) September 24, 2016
MNS had yesterday threatened Pakistani artists to leave Mumbai within 48 hours or they will throw them out.
— ANI (@ANI_news) September 24, 2016