मुंबई : मकार संक्रातीत पतंग उडवण्यासाठी बेकायदा नायलाॅन मांजा विरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहिम राबवली. त्या मोहिमे अंतर्गत १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान ३५ हजार किंमतीचा नायलॉन मांजा व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.
पतंग उडवणाऱ्यांकडून सर्रास नायलॉन मांजाचा वापर करण्यात येतो. नायलॉन मांजामुळे नागरिकांना गंभीर स्वरुपाची दुखापत होण्याच्या घटना घडल्या आहेत. नायलॉन मांजामुळे शेकडो पक्षी दरवर्षी जखमी होतात. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने नायलॉन मांजाचा वापर करण्यास बंदी घातली आहे. मात्र तरीही हा मांजा बाजारपेठेतून पुरता हद्दपार झालेला नाही. त्यामुळे त्याचा वापर होत असल्याचे दिसते. काही ठिकाणी मांजाची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली. नायलाॅन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी गुन्हे शाखेने पथके तयार केली आहेत.
मुंबई पोलिसांनी १० ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत बेकायदेशीर नायलॉन मांजाच्या वापराबाबत विशेष मोहिम राबवली. त्या मोहिमेदरम्यान भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमांअंतर्गत १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कारवाईत १९ व्यक्तींना अटक करण्यात आले आहे अथवा नोटीस देण्यात आल्या आहेत. कारवाईत पोलिसांनी ३५ हजार ३५० रुपये किंमतीचा नायलॉन मांजा आणि संबंधित सामग्री जप्त केली. बेकायदेशीर व्यापारात सहभागी असलेल्या इतर आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.