मुंबई : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अबाल-वृद्धांसह तरूण मंडळी मंगळवारी सज्ज होत असतानाच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी सराईत आरोपींविरोधात विशेष मोहीम राबवली. याशिवाय नाकाबंदीदरम्यान वाहतूक नियम तोडणाऱ्यांविरोधात विशेष कारवाई करण्यात आली. त्याअंतर्गत विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या सात हजारांहून अधिक दुचाकीस्वारांविरोधात कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर १४ हजार ५०० पोलीस तैनात करण्यात आले होते.
नागरिकांना नववर्ष आगमन सुरक्षितपणे व निर्विघ्नपणे साजरा करता यावा यासाठी मुंबई पोलीस दलाने आठ अपर पोलीस आयुक्त, २९ पोलीस उप आयुक्त, ५३ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह २१८४ पोलीस अधिकारी व १२ हजार ४८ पोलीस अंमलदार बंदोबस्तसाठी तैनात केले होते. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस आठवड्याभरापासून विशेष मोहीम राबवत आहेत. त्याअंतर्गत शस्त्रास्त्र कायद्यातील व संशयीत आरोपी, चोरी प्रकरणातील आरोपी, तसेच वाहतूक नियम तोडणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत शहरात १०० हून अधिक ठिकाणी नाकाबंदी करून पाच हजार वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात ३७ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली. गेल्या तीन दिवसांत विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या सात हजारांहून अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. तसेच नाकाबंदीदरम्यान अमली पदार्थांसह नऊ जणांना पकडण्यात आले.
हेही वाचा…घरात शिरून मुलीच्या डोक्यावर लावली बंदुक, महिलेने प्रसंगावधान दाखवून आरोपी पकडून दिले
बेकायदा शस्त्र बाळगण्याचा पूर्वइतिहास असलेल्या दीड हजार संशयातींची यादी तयार करण्यात आली असून त्यापैकी ५०० हून अधिक जणांची तपासणी करण्यात आली. तसेच जबरी चोरी, सोनसाखळी चोरीतील २६०६ सराईत आरोपींची यादी तयार करण्यात आली असून त्यापैकी पाचशेहून अधिक जणांची तपासणी करण्यात आली. पण त्यांच्याकडे काहीच संशयीत सापडले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय नववर्षाच्या पूर्वसंध्येलाही पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती.
नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक तरूणी आणि महिला तसेच अल्पवयीन मुली घराबाहेर पडतात. मात्र यादरम्यान मद्याच्या नशेत महिलांची छेडछाड केली जाते अथवा विनयभंगसारख्या घटना घडण्याची शक्यता असते. असे प्रकार घडू नयेत यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले होते. त्यासाठी निर्भया पथकाला गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले होते. नववर्ष स्वागतानिमित्त ३० डिसेंबर रोजी सायंकाळपासूनच रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, वरळी सी फेस, बॅण्डस्टॅन्ड, जुहू चौपाटी या परिसरात मोठ्या प्रमाणत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.