मुंबईतील कांदिवली परिसरात हिरानंदानी इस्टेट सोसायटीने बोगस लसीकरणाची तक्रार केल्यानंतर खळबळ माजली आहे. सोसायटीने आपण लसीकरण घोटाळ्याचे बळी पडल्याची तक्रार केल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. तसंच मध्य प्रदेशातून एकाला ताब्यात घेतलं आहे. फक्त सोसायटीच नाही तर मॅचबॉक्स पिक्चर्सनेही आपल्या कर्मचाऱ्यांची लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. पोलीस सध्या तपास करत असून हा मोठा घोटाळा असल्याची शक्यता व्यक्त होती असून रुग्णालयातील कर्मचारी यामागे असल्याचा संशय आहे.

पोलिसांनी कारवाई करत मध्य प्रदेशातील सटणा येथून करीम नावाच्या एका व्यक्तीलाही ताब्यात घेतलं आहे. घोटाळा उघड झाल्यानंतर करीमने मुंबईतून पळ काढला होता. करीम यानेच लसींचा पुरवठा केल्याचा संशय आहे. सोसायटीमधील रहिवाशांना देण्यात आलेल्या लसींच्या डोसची वैधताही पोलिसांकडून तपासली जात आहे. पोलीस सध्या पालिकेच्या रिपोर्टची वाट पाहत आहेत.

लसीकरण रॅकेटविरोधात अजून एक तक्रार दाखल

मॅचबॉक्स पिक्चर्सने आपल्या कर्मचाऱ्यांच्या बोगस लसीकरणाविरोधात तक्रार केली आहे. मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात लिखीत तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी अद्याप कोणता गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पहिली तक्रार कांदिवली पोलीस ठाण्यात करण्यात आलेली असून सध्या दोन्ही तक्रारींची चौकशी केली जात आहे.

मुंबईत लसीकरण घोटाळा?; हाऊसिंग सोसायटीतील ३९० जणांना बोगस लस दिल्याच्या आरोपानं खळबळ

एसपी इव्हेंटच्या माध्यमातून मॅचबॉक्स पिक्चर्सच्या जवळपास १५० कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना २९ मे रोजी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. महत्वाचं म्हणजे याच एसपी इव्हेंटच्या ग्रुपने कांदिवलीतील हिरानंदानी इस्टेट सोसायटीत लसीकरण मोहीम राबवली होती. रुग्णालयाचे माजी कर्मचारी राजेश पांडे आणि त्याचा सहकारी संजय गुप्ता यांच्या वतीने हे लसीकरण करण्यात आलं.

संजय गुप्ता इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असणारी एसपी इव्हेंटशी जोडलेला असून त्याने लसीसकरण मोहीमेसाठी अनेकांना आणलं होतं. मॅचबॉक्स पिक्सचर्सच्या कर्मचाऱ्याने आपली उघड जाहीर न करण्याच्या अटीवर इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, “लसीचा डोस दिल्यानंतर आम्हाला कोणतंही प्रमाणपत्र देण्यात आलं नाही. कंपनीने बॅकलॉग असल्याने एका आठवड्याने प्रमाणपत्र देऊ असं सांगितलं. लसीकरणानंतरची कोणतीही लक्षणं न जाणवल्याने आम्ही सगळे चिंतीत होतो”. दरम्यान पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत.

कांदिवलीत नेमकं काय झालं

मुंबईतील कांदिवली येथे असलेल्या हिरानंदानी इस्टेट सोसायटीत ३० मे रोजी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. सोसायटीच्या आवारातच झालेल्या या शिबिरात ३९० नागरिकांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली. राजेश पांडे असं शिबिराची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीचं नाव असून, त्याने स्वतःला कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचा प्रतिनिधी असल्याचं सोसायटीतील नागरिकांनी सांगितलं. राजेश पांडे याने सोसायटी समितीच्या सदस्यांशी संपर्क केला होता. तर संजय गुप्ता याने शिबीर घेतलं आणि महेंद्र सिंग यांने सोसायटीतील सोसायटी सदस्यांकडून रोख पैसे घेतले, अशी माहिती या शिबिरात लस घेतलेल्या नागरिकांनी दिली आहे.

याच शिबिरात लस घेतलेले हितेश पटेल म्हणाले, माझ्या मुलाने लस घेतली. एका डोससाठी १२६० रुपये दिले. पण, लस घेतल्यानंतर आम्हाला कोणताही मेसेज आला नाही. इतकंच नाही, तर आम्हाला लस घेताना फोटो सुद्धा काढू दिले नाही,” असं त्यांनी सांगितलं. सोसायटीतील नागरिकांनी प्रति डोस १२६० रुपये दिले. सोसायटीने जवळपास पाच लाख रुपये दिले असल्याचं माहिती संबंधित सदस्यांनी दिली.

“लस घेतल्यानंतर कोणतीही लक्षणं आम्हाला दिसली नाही किंवा दुष्परिणामही (साईड इफेक्टस्) दिसून आले नाहीत. त्यामुळे आम्हाला धक्काच बसला. इतकंच काय तर आम्हाला प्रमाणपत्रही दिली गेली नाही, त्यामुळे आम्ही शोधशोध घेण्यास सुरूवात केली. १०-१५ दिवसानंतर आम्हाला प्रमाणपत्र दिली गेली,” असं सोसायटीतील रहिवाशी असलेले ऋषभ कामदार यांनी सांगितलं. लसीकरण शिबीर घेतलं नसल्याचं रुग्णालयांनी स्पष्ट केल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी संबंधित रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

Story img Loader