तीन वर्षांत मुंबई पोलिसांनी ‘बेस्ट’चे २८ कोटी थकवले!
एरवी लाखो रुपयांच्या ‘वसुली’साठी पक्क्या असणाऱ्या मुंबई पोलिसांच्या हिशेबात मात्र बेस्टची कोटय़वधी रुपयांची थकबाकी खिजगणतीतही नसल्याची बाब उघड झाली आहे. गेल्या तीन वर्षांत मुंबई पोलिसांनी बेस्टचे तब्बल २८ कोटी रुपये थकविले आहेत. या अशा थकबाकीमुळेच बेस्ट आर्थिकदृष्टय़ा गाळात रुतली आहे. त्यामुळे ही थकबाकी तातडीने वसूल करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शहरात व उपनगरात प्रवास करणाऱ्यांसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस शिपायापर्यंत बेस्टचा पास देण्यात येतो. बेस्टच्या या विशेष पासावर शहरात कुठेही प्रवास करण्याची मुभा असते. यात आतापर्यंत ४३ हजार १९८ पोलिसांना बेस्टचे पास देण्यात आले आहेत. यातून बेस्टला दरमहा सुमारे १ कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र मार्च, २०१३ ते मे, २०१६ या कालावधीत पोलिसांकडून वापरण्यात आलेल्या बेस्टचा पासचे बिल अद्याप देण्यात आले नसल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले. सध्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याकरिता बेस्टला कर्ज काढावे लागत आहे. त्यामुळे अशा प्रकारची थकबाकी बेस्टला पडवणारी नसल्याचे बेस्टचे अधिकारी सांगत आहेत.
तर बेस्टच्या प्रवासात प्रवाशाने तिकीट न काढल्यास त्या प्रवाशाकडून बस गाडीच्या एका तिकिटाच्या किमान सात ते आठ पट अधिक दंड आकारला जातो.
मात्र याच धर्तीवर मुंबई पोलिसांच्या तुकडीतील वरिष्ठ अधिकारी व शिपायांनी थकवलेल्या एकूण २८ कोटींची बिले मात्र बेस्टकडून दुर्लक्षित केली जात असल्याचा आरोप बेस्ट समितीचे सदस्य करीत आहेत. याबाबत बेस्टच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, मे महिन्यात पोलिसांकडून केवळ तीन कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली असून इतर रक्कम अद्याप शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.