मुंबई : दादर येथे शुक्रवारी भररस्त्यात झालेल्या हत्येचा उलगडा करण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले असून अवघ्या ४८ तासांमध्ये पोलिसांनी मारेकऱ्यांना गजाआड केले आहे. दिल्ली येथील व्यावसायिकाने मनोज मोर्या या व्यक्तीची हत्या घडवून आणली होती. मोर्या यांच्या पत्नीशी झालेल्या वादातून ही हत्या केल्याचे आणि त्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिली गेल्याचे तपासातून उघड झाले आहे.

राधाकृष्ण कुशवाह (३७) असे या व्यावसायिकाचे नाव असून त्याच्यासह मोर्या यांच्यावर गोळी झाडणाऱ्या राजेंद्र अहेरवार (३०) आणि हेमेंद्र कुशवाह (१९) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

दादरच्या सेनापती बापट मार्गावर राहणारे मौर्या यांची शुक्रवारी भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण दादर परिसर हादरला. गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांच्या नेतृत्त्वाखालील पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाझ काझी, चव्हाण, होवाळ, लोंढे, राऊत आणि पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या पथकाने या प्रकरणाचा युद्धपातळीवर तपास केला. मौर्या यांच्या हत्येची पाळेमुळे दिल्लीत असल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांनी दिल्ली गाठत अवघ्या ४८ तासांमध्ये राधाकृष्ण कुशवाह आणि अन्य आरोपींना गजाआड केले. कुशवाह याला पोलिसांनी दिल्लीच्या लक्ष्मीपार्क परिसरातून अटक केली.

२०१५ ते २०१७ या कालावधीत मौर्या हे पत्नीसह दिल्लीत वास्तव्यास होते. तेथे कुशवाह यांच्या डिझेल बुस्टर बनवण्याच्या कंपनीत मौर्या यांची पत्नी नोकरीला होती. तिच्यासोबत कुशवाह यांचा वाद झाला होता. त्यानंतर मौर्य सपत्नीक मुंबईला निघून आले. मात्र, या वादामुळे कुशवाह याचे कंपनीतील भागीदार वेगळे झाले आणि त्याला व्यवसायात नुकसानही सहन करावे लागले. या लगळ्याला मौर्या यांच्या पत्नीशी झालेला वाद कारणीभूत असल्याचा राग मनात ठेवून कुशवाह यांनी मौर्या यांच्या हत्येचा कट रचला.

दोन महिन्यांपूर्वी कुशवाह हा राजेंद्र आणि हेमेंद्र यांना घेऊन मुंबईतही आला होता. त्यावेळी त्याने मौर्या यांचे घर, त्यांचे कामाचे ठिकाण त्यांना दाखवले. शिवाय पुन्हा दिल्लीला परतताना दोघांनाही पिस्तुल खरेदीसाठी पाच हजार रुपये दिले. ठरल्यानुसार ९ ऑक्टोबर रोजी दोघेही रेल्वेने मुंबईत दाखल झाले. दोन दिवस त्यांनी मौर्या यांचा पाठलाग केला. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी मौर्या यांच्यावर भररस्त्यात गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आणि दादर स्थानक गाठून तेथून दोघांनीही लांब पल्ल्याच्या गाडीने पलायन केले, अशी कबुली दोघांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

५० हजारांची सुपारी

पाच महिन्यांपूर्वीच कुशवाह याने हा कट रचला. उत्तर प्रदेशच्या मोखरी येथील रहिवाशी असलेल्या राजेंद्र आणि हेमेंद्र यांना त्याने ५० हजार रूपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे.