मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी मुंबई पोलिसांकडे आली असून त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुंबई पोलीस कंट्रोल रुमला यासंदर्भात एक निनावी फोन कॉल आला असून त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. एएनआयनं यासंदर्भात एक्सवर (ट्विटर) माहिती दिली आहे. यानुसार शनिवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास मुंबई पोलिसांना हा फोन कॉल आला. त्यानंतर पोलिसांनी मुंबईत विविध ठिकाणी तपास सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईत आम्ही बॉम्बस्फोट घडवणार आहोत, असं सांगणारा एक फोन काॉल संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला. समोरून बोलणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? याविषयी कोणतीही माहिती त्या कॉलमध्ये देण्यात आली नाही. बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिल्यानंतर फोन करणाऱ्याकडून अधिक माहिती काढून घेण्याचा प्रयत्न कंट्रोल रूममधील कर्मचाऱ्यानं केला. मात्र, धमकी दिल्यानंतर लागलीच समोरच्या व्यक्तीने फोन कट केला.

फोन करणाऱ्याचा शोध सुरू

दरम्यान, फोन करणाऱ्याच्या बाबतीत इतर माहिती पोलीस गोळा करत असून हा फोन नेमका कुठून आला? कुणी केला? फोन करणाऱ्याचा नेमका काय उद्देश होता? यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader