मुंबईः हास्य कलाकार वीर दास याच्या कार्यक्रमावरून बंगळुरू येथे वाद सुरू असताना मुंबई पोलिसांनीही त्याच्याविरोधात स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निर्माता अश्विन गिडवाणी यांच्या तक्रारीवरून वीर दाससह चौघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानावरील आंदोलनाप्रकरणी १८ जणांविरोधात गुन्हा; कफ परेड पोलिसांची कारवाई
तक्रारदार अश्विन गिडवाणी हे अश्विन गिडवाणी प्रो. प्रा. लि. या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक आहेत. तक्रारदार यांची कंपनी विविध हास्य कलाकारांसह कार्यक्रमांचे आयोजन करते. गिडवाणी यांच्या कंपनीने २०१० मध्ये हास्य कलाकार वीर दासला हिस्ट्री ऑफ इंडिया रिटन या कार्यक्रमाच्या पटकथेचे, दिग्दर्शनाचे काम करण्याचे अधिकार दिले होते. पण कार्यक्रमाच्या पटकथेचे व कार्यक्रम प्रसारीत करण्याचे सर्व हक्क कंपनीने राखून ठेवले होते. हा कार्यक्रम देश विदेशात खूप लोकप्रिय झाला. त्यानंतर २०१९ मध्ये वीर दासने हा कार्यक्रम थोडाफार बदल करून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारीत करण्याबाबत ईमेल गिडवाणी यांच्या कंपनीला केला.
तक्रारीनुसार गिडावाणी यांची कोणतीही परवागी न घेता कार्यक्रमाची जाहिरात तक्रारदार गिडवाणी यांन पाहिली. त्यानंतर त्याने वीर दासला याबाबत नोटीसही बजावली. त्यानंतरही वीर दास फॉर इंडिया हा कार्यक्रम करण्यात आला. जुन्या कार्यक्रमातच थोडाफार बदल करून नवीन कार्यक्रम दाखवण्यात आल्याचा गिडवाणी यांचा आरोप असून त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर कफ परेड पोलिसांनी हास्यकलाकार वीर दास, अनुराग श्रीवास्तव, गिरीश तलवार व नेटफ्लिक्स विरोधात गुन्हा दाखल केला आहे.