मुंबई : दहिसर आणि मुलुंड येथे उभारण्यात आलेल्या करोना केंद्रांमध्ये झालेल्या कथित गैरव्यहाराप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्र व खोट्या माहितीच्या आधारे ३७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप असून याप्रकरणी कंत्राटदार ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रा. लि. चे राहुल गोम्स आणि महापालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार आहे. दरम्यान, राहुल गोम्स हे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

हेही वाचा : मुंबईच्या किमान तापमानात चढ – उतार सुरुच

आरोपींनी १ ऑक्टोबर २०२० ते १ ऑगस्ट २०२२ यादरम्यान कट रचून हा संपूर्ण गैरव्यवहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा ठेंगे यांनी स्वतः याप्रकरणी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार कंत्राटदार मे. ओक्स मॅनेजमेंट कन्सलटन्सी प्रा. लिमि.चे संचालक राहुल गोम्स यांनी दहिसर व मुलुंड येथील जम्बो करोना केंद्राची उभारणी केली. ते मुंबई महापालिकेला हस्तांतरित केल्यानंतर भाड्याच्या मागणीसाठी अप्रमाणिकपणे खोटी माहिती आणि देयके महापालिकेला सादर केली. मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदार व व्हेंडर्स यांच्यासोबत कट रचून हा संपूर्ण गैरव्यवहार घडवून आणला. अधिकाऱ्यांनी अधिकाराचा दुरूपयोग करून जाणीवपूर्वक खोटी देयके मंजूर केली. त्या बदल्यात कंत्राटदाराला ३७ कोटी रुपयांचा लाभ मिळाला. त्यामुळे सरकारचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कट रचणे, बनावट कागदपत्र तयार करणे, त्यांचा गैरवापर करणे, फसवणूक करणे अशा विविध कलमांतर्गत कंत्राटदार राहुल गोम्स व त्यांचे वेंडर्स, मुंबई महापालिकेचे तत्कालीन संबंधित अधिकारी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या वांद्र्यातील घरात चोरी, लग्नात मिळालेले सहा लाखांचे दागिने लंपास; पोलिसांनी केली ‘या’ व्यक्तीला अटक

राहुल गोम्स यांना मिळालेल्या कंत्राटाबाबतही सक्त वसुली संचलनायलाने ( ईडी) पडताळणी केली होती. गोम्स यांच्या कंपनीने कोविड फील्ड रुग्णालयांमध्ये खाटा, पंखे, तंबू आणि इतर सुविधा पुरवल्या होत्या. त्याबाबत गैरव्यवहार झाल्याची माहिती ईडीला मिळाल्यानंतर त्यांनी याबाबतचे पुरावे मुंबई पोलिसांना दिले होते. त्या पुरव्यांच्या आधारवर आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी प्राथमिक चौकशीला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी बुधवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Story img Loader