मुंबई : माहीम खाडी परिसरात सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी हत्येचा गुन्हा दाखल केला. मृतदेहावर गंभीर जखमा असून त्याचे हात-पाय बांधून फेकण्यात आले होते. प्राथमिक पाहणीत हा हत्येचा प्रकार वाटत असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आसल्याचे पोलिसांनी सांगितले.
माहीम मच्छीमार कॉलनी परिसरातील रामगड झोपडपट्टीच्या समोर खाडी परिसरात जखमी व्यक्ती असल्याची माहिती माहीम पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यावेळी तेथील पाईप लाईनजवळ एक व्यक्ती पडलेला आढळला.
हेही वाचा…फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरण : ईडीकडून आतापर्यंत ३४४ कोटींच्या मालमत्तेवर टाच
त्याला तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची पाहणी करून त्याला मृत घोषित केले. प्राथमिक पाहणीत मृत व्यक्तीच्या हाता-पायावर तीक्ष्ण हत्याराने गंभीर जखमा करण्यात आल्या होत्या. त्या व्यक्तीला मारहाण करून हत्याराने वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे हात-पाय टॉवेलने बांधून त्याला पाण्यात फेकण्यात आले, असा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक मेहबूब पठाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तपास करण्यात येत आहे.