मुंबई : मकर सक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाचा वापर टाळण्यासाठी २५ डिसेंबरपासून मुंबई पोलिसांनी विशेष मोहिम सुरू केली होती. त्या अंतर्गत नायलॉन मांजा वापरल्याप्रकरणी ९२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ५७ जणांना अटक करण्यात आली असून पश्चिम द्रूतगती मार्गावर नायलॉन मांजा गळ्याला अडकून एक दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना विलेपार्ले परिसरात घडली. नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असल्यामुळे मुंबई पोलिसांनी २५ डिसेंबरपासून नायलॉन मांजाच्या वापराविरोधात विशेष मोहिम राबवण्यास सुरूवात केली होती.
हेही वाचा >>> उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मोठी घटना घडणार असल्याबाबत महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी
या मोहिमेत १४ जानेवारीपर्यंत मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ९२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ५७ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या कारवाईत एक लाख ४३ हजार २४० किमतीचा नायलॉन मांजाही जप्त करण्यात आला आहे. १२ डिसेंबरला पश्चिम द्रुतगती मार्गावर नायलॉनच्या मांजामुळे एका पोलिस हवालदारचा देखील मृत्यू झाला होता.मृत पोलीस शिपाई समीर जाधव हे दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. महिन्याभरात पश्चिम द्रुतगती मार्गावर नायलॉन मांजामुळे दुसरा अपघात झाला असून रविवारी सायंकाळी कामावरून घरी जात असताना पश्चिम द्रुतगती मार्गावर विलेपार्ले येते ही घटना घडली. जखमी दुचाकीस्वाराचे नाव जालिंदर भगवान नेमाने (४१) असून ते सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. त्यांची प्रकृती सध्या स्थीर असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.